शिंदे सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवर त्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुलेट ट्रेन टर्मिनससाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंड लवकरात लवकर ‘द नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन’ला (एनएचएसआरसीएल) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना केंद्र बंद करून भूखंड परत देण्याची विनंती एमएमआरडीएने मुंबई महानगरपालिकेला केली आहे. मात्र सप्टेंबरपर्यंत करोना केंद्राची गरज असल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सप्टेंबरनंतरच हा भूखंड ‘एनएचएसआरसीएल’ला हस्तांतरित करण्यात येईल, असा अंदाच व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एनएचएसआरसीएल’ला वांद्रे-कुर्ला संकुलातील ४.२ हेक्टरचा भूखंड बुलेट ट्रेन टर्मिनससाठी देण्यात येणार आहे. हा भूखंड देण्यावरून बराच वाद रंगला होता. मात्र अखेर हा भूखंड देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन टर्मिनससाठीच्या देण्यात येणाऱ्या भूखंडावर वांद्रे-कुर्ला संकुल करोना केंद्र उभे आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने करोनां केंद्र बंद करून हा भूखंड डिसेंबर २०२१ मध्ये परत करावा, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने केंद्र बंद करता येणार नाही असे मुंबई महानगरपालिकेने कळविल्याने भूखंड हस्तांतरणाचा विषय मागे पडला होता.

राज्यातील सत्तांतरानंतर भाजपने आपला महत्त्वाकांक्षी असा बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांना रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ‘एमएमआरडीए’ने बुलेट ट्रेन टर्मिनससाठी राखीव भूखंड ‘एनएचएसआरसीएल’ला हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. येथील करोना केंद्र बंद करून भूखंड परत करण्याची विनंती मुंबई महानगरपालिकेला करण्यात आली आहे. महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी त्याला दुजोरा दिला आहे. आपण स्वतः मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सप्टेंबरपर्यंत केंद्र बंद करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सप्टेंबरनंतर हा भूखंड रिकामा करून देण्याची विनंती करण्यात आल्याचे श्रीनिवास यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘एनएचएसआरसीएल’ला सप्टेंबरनंतरच हा भूखंड मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल बुलेट ट्रेन टर्मिनसच्या बांधकामासाठी निविदा मागविण्याचा मार्ग मोकळा होईल. ‘एनएचएसआरसीएल’ने या टर्मिनससाठी २०१९ मध्ये निविदा काढल्या होत्या. मात्र भूखंड हस्तांतरण रखडल्याने निविदेला तब्बल ११ वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर ‘एनएचएसआरसीएल’ने निविदाच रद्द केली आणि महाराष्ट्रातील प्रकल्पाचा टप्पा रखडला.

या भूखंडावर भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस उभारण्यात येणार असून एमएमआरडीए तेथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर) उभारणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfer of bandra kurla land for bullet train after september mumbai print news amy
First published on: 14-07-2022 at 13:37 IST