मुंबई : मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असताना केलेल्या बदल्या रद्द करण्याचेही सत्र सुरू झाले आहे. गेल्याच आठवडय़ात निवडणूक, प्लास्टिक बंदी, मराठी पाटय़ा या विषयाशी संबंधित अधिकारी उप आयुक्त संजोग कबरे यांची बदली करण्यात आली होती, तर सह आयुक्त विजय बालमवार यांना कबरे यांच्या जागी आणले होते. आठवडय़ाभरातच आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आपला निर्णय बदलत दोन्ही अधिकाऱ्यांना पुन्हा आपापल्या पदाचा कारभार दिला आहे.  

हेही वाचा >>> ईडा पिडा टळून राज्यातल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील सत्तांतरानंतर पालिकेत मोठय़ा प्रमाणावर प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्यातच उपायुक्त संजोग कबरे यांची बदली पश्चिम उपनगरातील परिमंडळ ४ मध्ये करण्यात आली होती. तर परिमंडळ ४ चे सह आयुक्त विजय बालमवार यांच्याकडे उपायुक्त विशेष पदाचा कार्यभार देण्यात आला होता.  मात्र निवडणूक जवळ आलेली असताना केलेल्या या बदलीवर टीका झाली.  आता पालिका आयुक्तांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना आपल्या मूळ पदावर परत पाठवले असून त्याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहेत. वारंवार राजकीय आकसातून होणाऱ्या बदल्यांमुळे अधिकारी वर्गातही नाराजी, संताप आणि भीतीचे वातावरण आहे.  या बदल्या रद्दही करण्याची वेळ आयुक्तांवर आली आहे. या सगळय़ा घटनांमुळे प्रशासनावरील दबाव आणि गोंधळाचे वातावरण दिसून येते आहे.