scorecardresearch

चर्चगेट स्थानक परिसरातील पदपथांचा कायापालट ; डिसेंबर २०२२ अखेपर्यंत कामे पूर्ण

चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या, तर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या पदपथांचा कायापालट करण्यात येणार आहे.

मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या, तर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या पदपथांचा कायापालट करण्यात येणार आहे. पालिकेच्या रस्ते विभागाच्या माध्यमातून या दोन परिसरात विकासासह बस थांब्यांचे सौंदर्यीकरण आणि रंगरंगोटी करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून ही कामे डिसेंबर २०२२ अखेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
चर्चगेट उपनगरीय रेल्वे स्थानक आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक हे दोन्ही परिसर पुरातन वास्तू परिसर आहेत. या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तसेच मेट्रो चित्रपटगृहालगत माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊचा जीर्णोद्धारही करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन सोमवारी पार पडले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, उपआयुक्त उल्हास महाले, ए विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) शिवदास गुरव, माजी नगरसेविका सुजाता सानप आदी यावेळी उपस्थित होते.
कोठारी प्याऊचे नूतनीकरण
पूर्वी मुंबई शहरात वाटसरुंची तसेच प्राण्यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोई अर्थात प्याऊंची निर्मिती करण्यात आली होती. या प्याऊंचे संचालन धर्मादाय संस्था अथवा दात्यांकडून केले जात असे. माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊ ही अशीच पुरातन प्याऊ आहे. मंदिरांच्या शिखराप्रमाणे दोन नक्षीदार कमान असलेल्या या प्याऊचा शास्त्रोक्त पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. प्याऊची मूळ नक्षीदार संरचना पूर्ववत करणे, तुटलेले पुरातन भाग त्याच प्रकारच्या दगडांपासून तयार करून पुनस्र्थापित करणे, ओतीव लोखंडांचे नक्षीदार नळ बसविणे, जलव्यवस्था पूर्ववत करून टाकीमधून शुद्ध पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था करणे अशी निरनिराळी कामे जीर्णोद्धारात समाविष्ट आहेत. जीर्णोद्धाराचे काम येत्या ९ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यासोबत ३ वर्षे परिरक्षणाचे कामही सोपविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Transformation sidewalks churchgate station area works completed december railways dr shamaprasad mukherjee chowk amy