मुंबई : करोनाकाळात नागपूरला जाण्यासाठी विशेष विमानाचा वापर हा वैयक्तिक कारणासाठी नव्हे, तर अधिकृत कामासाठी केल्याचा दावा माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला.

टाळेबंदीच्या काळात वैयक्तिक कामासाठी विशेष विमान वापरले आणि त्यासाठीचा कोटय़वधी रुपये खर्च राज्य वीज कंपन्यांकडून वसूल केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई भाजप सदस्य विश्वास पाठक यांनी केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी राऊत यांनी टाळेबंदीच्या काळात १२ वेळा विशेष विमानसेवा वापरली आणि त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले, असे पाठक यंच्या वकील सोनल यांनी न्यायालयाला सांगितले. तर पाठक यांनी याचिकेत केलेल्या आरोपांचे खंडन करणारे प्रतिज्ञापत्र राऊत यांच्यातर्फे यावेळी सादर करण्यात आले. तसेच याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्याची मागणी करण्यात आली.

राऊत यांनी आपण टाळेबंदीच्या काळात खासगी विमानसेवा वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा आणि त्याचे पैसे देण्यासाठी राज्य वीज कंपन्यांवर दबाव टाकल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात केला आहे. खासगी विमानसेवेसाठी केलेला खर्च बेकायदेशीर, मनमानी आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय असल्याचा आरोपही चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाठक यांनी आपल्याविरूद्ध या प्रकरणी यापूर्वीच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. दोन्ही यंत्रणांनी पाठक यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाकडून त्यांची याचिका ऐकली जाऊ नये, अशी विनंतीही राऊत यांनी केली आहे. याशिवाय याचिकाकर्ते हे भाजप सदस्य आहेत आणि त्यांनी ही याचिका राजकीय हेतूने केली असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.