दहिसर नदीचे प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न

बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तून वाहणाऱ्या दहिसर नदीच्या पात्रात गणेशमूर्ती विसर्जनाला यंदा बंदी घालण्यात येणार आहे. मात्र यामुळे स्थानिकांचा रोष होऊ नये म्हणून प्रथमच उद्यानात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहे.

नदी स्वच्छता मोहिमेसाठी काम करणारी ‘रिव्हर मार्च’, महापालिका आणि वनविभागाच्या वतीने हा कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. उद्यानात अधिवास करणाऱ्या स्थानिकांकडून व आजूबाजूच्या नागरी वस्तींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून दहिसर नदीत सुमारे ३,३०० गणेशमूर्तीचे विसर्जन दरवर्षी होते. मात्र गणेशोत्सवानंतर उद्यानातील नदीचे पात्र मोठय़ा प्रमाणात प्रदूषित होते. वर्षांनुवर्षे चाललेला हा प्रकार मोडीत काढण्यासाठी ‘रिव्हर मार्च’चे कार्यकत्रे सरसावले आहेत. महापालिका आणि वन विभागाच्या मदतीने उद्यानात प्रथमच गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहे.

दहिसर नदीचा उगम हा तुळशी तलावापाशी होतो. तलाव भरल्यानंतर त्याचे ओसंडून जाणारे पाणी नदीच्या पात्रात येते. त्यामुळे पावसाळ्यात दहिसर नदी खळखळून वाहत असते. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे दहिसर नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. दरवर्षी उद्यानाच्या नौकाविहार केंद्राजवळ  गणपती विसर्जन होते. यंदा मात्र त्या ठिकाणी पाण्याची पातळी फारच कमी आहे. त्यामुळे कमी झालेली पाण्याची पातळी आणि नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने प्रथमच कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. कृत्रिम तलाव आठ ते नऊ फूट खोल असल्याने त्यामध्ये घरगुती गणपती विसर्जित करता येतील, अशी माहिती रिव्हर मार्चचे विक्रम चौगुले यांनी दिली. उद्यानातून वाहणारे दहिसर नदीचे पात्र स्वच्छ असून गणेशमूर्ती विसर्जनामुळे निर्माण होणारे प्रदूषण रोखण्याकरिता हे आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय उद्यानात प्रथमच पालिकेकडून कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहे. १५ फूट लांब आणि २० फूट रुंद खड्डा जमिनीमध्ये खणण्यात येणार असून त्याची खोली आठ ते नऊ फूट असणार आहे. यासाठी वनविभागाची परवानगी मिळाली असून जागेची पाहणी केली आहे.

– रमाकांत बिरादार, साहाय्यक आयुक्त, आर मध्य विभाग