कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील नवीन कचोरे गोविंदवाडी वसाहतीमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिकेच्या साहय्यक आयुक्तावर केरोसीन ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न मंगळवारी दुपारी झाला. या घटनेवरून शहर परिसरात भूमाफियांचा उन्माद किती वाढला आहे हे दिसून येते.
या वसाहतीत काही भूमाफिया चाळी बांधत असल्याच्या तक्रारी अतिक्रमण विभागाचे साहय्यक आयुक्त कृष्णा लेंडेकर यांच्याकडे आल्या होत्या. मंगळवारी दुपारी अतिक्रमण विरोधी पथक, पोलिसांसह लेंडेकर यांनी गोविंदवाडी येथील बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू केली. या वेळी बशीर शेख यांचे बांधकाम तोडत असताना प्रखर विरोध झाला. बशीर शेख यांनी पालिकेने कोणतीही नोटिस न देता बांधकामे तोडण्याची कारवाई केली म्हणून संतप्त होऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि आपल्याही अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला, असे लेंडेकेर यांनी सांगितले. येथील ४०० लोकांचा जमाव हिंसक होऊन तो पालिका पथकाच्या अंगावर धावून आला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली. शेख यांच्या विरोधात लेंडेकर यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शेख यांनी मात्र आपण अधिकाऱ्यावर रॉकेल ओतले नाही, असे म्हटले आहे.
बांधकाम तोडू नये म्हणून पालिका अधिकारी प्रथम हजारो रुपये मागतात. तक्रार झाली
की मग बांधकाम तोडण्यासाठी येतात. त्या वेळीही ते पैशांची मागणी करतात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.