वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. एरव्ही कुठल्याही मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पहायला मिळतो. मात्र, वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून एक सत्ताधारी पक्षच विरोधात, सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष उभा ठाकला आहे. सत्ताधारी शिवसेनेने आज विधीमंडळात ‘अखंड महाराष्ट्रा’ची हाक दिल्यानंतर मराठीचा जाज्वल्य अभिमान असलेली सोशल मीडियावरील मराठी बाणाही जागृत झाला आहे.
भाजपला सत्तेचा माज चढला असून महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणा-यांना पुढील निवडणुकांमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, महाराष्ट्राचे रक्षकच भक्षक बनले आहेत, भाजपला राजकीय स्वार्थासाठी विदर्भ वेगळा हवा आहे. ही मागणी विदर्भातील जनतेची नसून भाजपमधील नेत्यांची आहे, अशा कडवट प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर वेगळ्या विदर्भाची मागणी करणा-या भाजपला लोकांनी वेगळा काश्मीर, मराठवाडा, मुंबईच्या मागण्याचीही उदाहरणे देऊन समज देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच घरफोड्याच्या हातातच लोकांनी तिजोरीच्या चाव्या दिल्या असल्याचे एकाचे म्हणणे आहे. एकंदरीत वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून राजकीय पक्षांसोबतच लोकांमध्येही प्रचंड नाराजी असून, आगामी काळात यामुळे मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.