मुंबई : दहिसर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कर्मचाऱ्याची हत्या करून दोन लाख ७० हजार रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांनी आठ तासांत दोन आरोपींना अटक केली. आरोपींनी केलेल्या गोळीबारात बँकेचा कंत्राटी कर्मचारी संदेश गोमारेचा मृत्यू झाला होता.

धर्मेद्र सुभाषचंद्र यादव (२१) व विकास गुलाबधर यादव (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही दहिसर पश्चिम येथील रहिवासी आहे. यातील धर्मेद्र हा वेटर, तर विकास हा नोकरी करतो. दोघेही मूळचे बिहार येथील रहिवासी असून तेथून आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तूल आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  श्वानपथक व सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या गुन्ह्यांची उकल केली. सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.