आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन,

मुंबई : टाळेबंदीचे बहुतांश निर्बंध हळूहळू शिथिल झाल्याने यंदाच्या दिवाळीत मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडले जाण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच केलेल्या चाचणीत दोन फटाके सदोष असल्याचे आढळले. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि फटाक्यांमध्ये समाविष्ट असलेल्या रसायनांची अपुरी माहिती या कारणास्तव या सदोष फटाक्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने फटाक्यांची चाचणी करण्यात येते. बाजारात उपलब्ध असलेले फटाके खरेदी करून ते फोडून पाहिले जातात. ‘आवाज फाऊंडेशन’च्या साहाय्याने यंदा चेंबूर येथे ही चाचणी घेण्यात आली. चाचणीमध्ये १५ हरित फटाके आणि १५ पारंपरिक फटाके फोडण्यात आले. त्यापैकी दोन फटाक्यांनी आवाजाची अपेक्षित मर्यादा ओलांडली. अनेक फटाक्यांवर त्यात समाविष्ट असलेल्या रसायनांची पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने घातक ठरवलेल्या या रसायनाचा समावेश काही फटाक्यांमध्ये आढळला. आरोग्यविषयक निकषांचे  पालन न करणारे फटाके विक्री होण्यापूर्वी बाजारातून जप्त केले जावेत, अशी सूचना करणारे पत्र ‘आवाज फाऊंडेशन’च्या सुमायरा अब्दुलाली यांनी मुख्यमंत्र्यांना आणि पर्यावरण मंत्र्यांना लिहिले आहे.

हे फटाके सदोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फटाक्यांचा आवाज सुरू होण्याची कमाल मर्यादा १२५ डेसिबल आणि सर्वोच्च ध्वनििबदूची कमाल मर्यादा १४५ डेसिबल आहे. गुरुवारी झालेल्या चाचणीत स्टॅण्डर्ड कंपनीच्या ‘हॉलीवूड ड्रीम्स’ या हरित फटाक्याने आवाज सुरू होण्याची मर्यादा ओलांडली. या फटाक्याचा आवाज १२७.५ डेसिबलपासून सुरू होऊन १४४.५ डेसिबल या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचला. राजकमल कंपनीच्या ‘अकिरा लडी’ या पारंपरिक फटाक्याची आवाज सुरू होण्याची मर्यादा ११० डेसिबल आणि सर्वोच्च ध्वनििबदूची मर्यादा १३० डेसिबल आहे. चाचणीमध्ये या फटाक्याचा आवाज १२१.१ डेसिबलपासून सुरू झाला आणि १३८.७ डेसिबलपर्यंत पोहोचला.