मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या गटात दिवसभरात चार आमदारांची नव्याने भर पडली. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार दोन तृतीयांश आमदार मूळ पक्षातून बाहेर पडल्यास अपात्रतेची कारवाई होत नाही. यामुळेच शिवसेनेतील ३७ किंवा त्यापेक्षा अधिक आमदार बाहेर पडावेत या दृष्टीने नियोजन सुरू आहे. दिवसभरात मंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम हे शिवसेनेचे दोन आमदार तसेच मंजूळा गावित आणि चंद्रकांत पाटील हे दोन अपक्ष शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या गोटात दाखल झाले. ३७ आमदारांची संख्या झाल्यावरच पुढील हालचाली केल्या जातील. सध्या शिवसेनेतील आणखी आमदार शिंदे गटात सहभागी व्हावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शिंदे हे शिवसेना आमदारांशी संपर्क साधत आहेत. याशिवाय भाजपकडून पुरेसे संख्याबळ व्हावे यासा  ठी प्रयत्न  सुरू आहेत. जळगाव आणि धुळय़ातील दोन अपक्ष आमदारांना गुवाहटीत नेण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने पुढाकार घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली हे कायदेशीरदृष्टय़ा सिद्ध करण्याकरिता ३७ आमदारांची आवश्यकता आहे.   ३७ आमदारांच्या स्वाक्षऱ्या प्राप्त झाल्यावर शिंदे यांच्याकडून राज्यपालांकडे पत्र दिले जाईल.   या पत्रात स्वतंत्र गट स्थापन करण्यात आल्याचा दावा केला जाईल. पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया केली जाईल, असे सांगण्यात आले. दुसरीकडे, शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची संख्या ३७ होऊ नये म्हणून शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत.

आमदार गुवाहाटीत

विधान परिषद निवडणूक पार पडल्यावर सोमवारी रात्री शिंदे व त्यांच्याबरोबरील आमदारांनी सूरत गाठली होती. मंगळवारी दिवसभर हे आमदार सूरतमध्ये होते. तेथे शिवसेना सचिव मििलद नार्वेकर हे शिंदे यांच्या भेटीसाठी पोहचले होते. सूरतमध्ये आमदारांना ठेवणे धोक्याचे आहे हे लक्षात आल्याने बुधवारी पहाटे या आमदारांना  भाजपची सत्ता असलेल्या आसामची राजधानी गुहावटीमध्ये विशेष विमानाने हलविण्यात आले. पुरेशा आमदारांचे संख्याबळ झाल्यावर या सर्व आमदारांना मुंबईला आणण्यात येईल. त्याआधी गोव्यात नेण्याची योजना आहे.

गुवाहाटीतून सुटलेलेआमदार देशमुख मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

अकोला : बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतला गेले खरे, पण त्यांच्या मनाची चलबिचल सुरूच होती..उत्तररात्री सुरतहून गुवाहाटीकडे जाण्याचे निश्चित झाले तेव्हा देशमुखांची अस्वस्थता आणखी वाढली..पण, सुरतहून सुटका शक्य नव्हती..त्यामुळे त्यांनी नाईलाजाने गुवाहाटीला नेणाऱ्या विमानात पाय ठेवले..पण, मनात वेगळीच योजना आकार घेत होती..ती योजना त्यांनी मुंबई येथील शिवसेनेचे  माजी नगरसेवक महादेव गवळे, अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांना सांगितली..त्यांनी पुढची सर्व तयारी करून ठेवली..अखेर गुवाहाटी विमानतळावर उतरताच देशमुखांनी  त्यांच्यासाठी सज्ज असलेले खासगी विमान (चार्टर्ड प्लेन) गाठले व  त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.  आपण शिताफीने परत आलो, असे आमदार नितीन देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मात्र असे  काहीच घडले नसून आमच्याच दोन सहकाऱ्यांनी त्यांना विमानतळावर सोडले, असा खुलासा केला आहे. 

गुवाहाटी विमानतळावरून नागपूरला येण्यासाठी आ. देशमुख यांच्यासाठी खासगी विमानाची व्यवस्था करण्यात आली होती.  या खासगी विमानाची व्यवस्था नेमकी कुणी केली, हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more shiv sena mlas support eknath shinde zws
First published on: 23-06-2022 at 05:34 IST