वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी अभियान राबवूनही नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्या मुंबईत जास्त आहे. मात्र नियमांचे पालन न करणे हे जीवावरही बेतू शकते, याचे प्रत्यंतर शनिवारी संध्याकाळी बोरिवलीत झालेल्या एका अपघातात आले.
 एका दुचाकीवरून तीन जण प्रवास करत असताना भरधाव वेगात चाललेली ही दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात दुचाकीवर बसलेले दोघे जण जागीच ठार झाले. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.
विशेष म्हणजे या चालकाकडे अनुज्ञाप्तीपत्र (लायसन्स) नसल्याचेही आढळले. पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणे गाडी चालवण्याची नोंद केली आहे.
बोरिवली पश्चिमेला असलेल्या एमएचबी कॉलनीत शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एका दुचाकीवरून तीन जण भरधाव वेगात जात होते. या वेळी चालक प्रशांत आलम (१७) याचे नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात प्रशांतसह त्याच्या मागे बसलेले अंकित भंडारी (२१) आणि मनीष दवे (१८) गंभीररित्या जखमी झाले. या तिघांनाही तातडीने भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान अंकित आणि मनीष या दोघांचा मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा प्रशांत हा १७ वर्षांचा असल्याने अनुज्ञाप्तीपत्र (लायसन्स) मिळवण्यासाठी अपात्र होता. तसेच त्याच्याकडे अनुज्ञाप्तीपत्र नव्हते. सध्या प्रशांतही गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याची नोंद केली आहे.