सांताक्रूझ- चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाला पूरक म्हणून कुल्र्यातील सीएसटी रस्त्यानजीक दोन नवे उड्डाणपूल बांधण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखली आहे. तर मिठी नदीजवळील ४० मीटर लांबीच्या पुलाची लांबी व रूंदी वाढवण्याचाही घाट घातला जाणार आहे. या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया ‘एमएमआरडीए’ने सुरू केली आहे.
पहिला नवीन उड्डाणपूल वांद्रे-कुर्ला संकुलाकडून कुल्र्याकडे येणाऱ्या रस्त्यापासून सीएसटी जंक्शनपर्यंत असेल तर दुसरा पूल कलिना विद्यापीठाकडे जाणारा रस्ता आणि सीएसटी रस्त्याला जोडेल. तसेच सध्याचा ४० मीटर लांब व ३० मीटर रूंद पूल १०० मीटर लांब आणि ४५ मीटर रूंद करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे सीएसटी रस्त्यावरील वाहतूक वाढण्याचा अंदाज आहे. ही वाहतुक सुरळीत करण्यासाठी व वांद्रे-कुर्ला संकुलाकडील वाहतूक थेट जोडरस्त्यापर्यंत आणण्यासाठी हे नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. सल्लागारांकडून पुलाबाबत सविस्तर अहवाल आल्यानंतर त्यावर आधारीत निवीदा काढल्या जातील.