मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (मुंबई विमानतळ) दोन्ही धावपट्टय़ा पावसाळापूर्व कामांसाठी १० मे रोजी सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे. यात देखभाल- दुरुस्तीची कामे केली जातील. या कामांमुळे विविध कंपन्यांच्या काही विमान सेवा रद्द, तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई विमानतळावर १४/३२ आणि ०९/२७ अशी मुख्य तसेच पर्यायी धावपट्टी आहे. पावसाळय़ात धावपट्टीवर पाणी साचू शकते. यामुळे धावपट्टीवर विमान उतरताना ते घसरण्याचीही शक्यता असते. यामुळे दुर्घटना होण्याचा धोका असतो. खबरदारी म्हणून दरवर्षी पावसाळय़ापूर्वी धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात आणि त्यासाठी धावपट्टी बंद ठेवली जाते. १० मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विमानतळावरील दोन्ही धावपट्टय़ा बंद ठेवण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले. याबाबत विमानतळ प्राधिकरणाने नोटीसही जारी केली आहे. या कामामुळे एकही विमान उड्डाण होणार नाही किंवा उतरणार नाही, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले. सायंकाळी पाचनंतर विमान सेवा पूर्ववत होईल. त्यामुळे प्रवाशांनी संबंधित विमान कंपन्यांकडून आरक्षित केलेल्या विमान सेवांबद्दलची माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.

मुंबई विमानतळ देशातील सर्व व्यग्र विमानतळ असून त्यानंतर दिल्ली विमानतळाचा क्रमांक लागतो. मुंबई विमानतळावर सध्या दररोज ६५० ते ७०० विमान फेऱ्या होतात. ब्लॉकमुळे यातील काही सेवा रद्द होतील. मुंबई विमानतळावर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २७ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत सहा लाख ३० हजार प्रवाशांनी प्रवास केला.