मुंबईतील गोरेगाव भागात असलेल्या इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गोदामाला सकाळच्या सुमारास भीषण आग लगाली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कसोशीने प्रयत्न करत आहेत. इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गोदामाला आज सकाळी अचानक आग लागली, त्यानंतर ही आग वेगाने पसरली त्यामुळे थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले.

इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये लागलेल्या या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने या ठिकाणी तातडीने धाव घेतली. ८ फाय इंजिन आणि ६ पाण्याचे बंब आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. या गोदामात अडकलेल्या १५ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या आगीत दोन गोदामे भस्मसात झाली आहेत. ही आग नेमकी का लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. २९ डिसेंबर रोजी कमला मिल परिसरात असलेल्या ‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन रेस्तराँमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई सत्र न्यायालय परिसर, कांजूरमार्ग भागात असलेला सिनेव्हिस्टा स्टुडिओ, रे रोड भागातील भंगार गोडाऊन या ठिकाणीही आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. २ फेब्रुवारीला दादर स्थानकात लोकलच्या दोन डब्यांना आग लागली होती ज्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महिन्याभरात घडलेल्या घटनांकडे नजर टाकली तर मुंबईत नेमकी कुठे आणि कोणत्या कारणाने आग लागेल हे आताही सांगता येत नाही. प्रशासन आग लागू नये म्हणून काय करते आहे? हा प्रश्न सामान्य मुंबईकरांच्या मनात आहे.