मुंबई : वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावर एक नवीन उड्डाणपूल बांधला आणि दोन महिन्यांपूर्वीच त्याचे लोकार्पण करण्यात आले. मात्र पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागल्यामुळे वाहतूक विभागाने दुचाकीस्वारांना त्यावरून जाण्यास बंदी घातली. मात्र असे असतानाही नियम धुडकावून अनेक दुचाकीस्वार या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जात आहेत.

कायम वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणाऱ्या मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावर तोडगा म्हणून पालिकेने दोन महिन्यांपूर्वी एक नवीन उड्डाणपूल बांधला. मात्र महिन्याभरातच या उड्डाणपलावर ४० पेक्षा अधिक अपघात झाल्याने काही दिवस हा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला. पुलावरील रस्ता निसरडा झाल्याने तेथे दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. अपघातामध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने पालिकेने उड्डाणपुलावरील रस्ता काही प्रमाणात खडबडीत केला. तर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी पुलावर गतिरोधकही बसविले.

उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटली आहे. असे असले तरी या पुलावर तुरळक वाहने दृष्टीस पडतात. याचाच फायदा घेऊन दुचाकीस्वार भरधाव वेगात येथून ये-जा करीत असतात. परिणामी, आजही दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वारथेट पुलावरून दुचाकीसह खाली कोसळला होता. या नंतर वाहतूक विभागाने या पुलावर दुचाकींना बंदी केली आहे. यासाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला फलक लावण्यात आले आहेत. मात्र तरीही बंदी झुगारून अनेक दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांची नजर चुकवत पुलावरून सुसाट जात असतात.

बंदी असताना अनेक दुचाकीस्वार या पुलावरून जात आहेत. मात्र वाहतूक पोलीस अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. – बळीराम धस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानखुर्द वाहतूक