शीव-पनवेल द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी दोन कामगारांचे मृतदेह सापडले असून त्यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.  
संतोष काळे (२४) आणि आमीर मोगले (२८) अशी या कामगारांची नावे आहेत. सकाळी पावणेआठच्या सुमारास एका पादचाऱ्याला या दोघांचेही मृतदेह  झुडपात आढळून आले. त्याने लगेचच पोलिसांना कळवले. दोन्ही मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. दोघांच्याही शरीरावर आढळून आलेल्या जखमांवरुन त्यांना बांबूने मारहाण करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शिवाय त्यांचा मृत्यू मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास झाल्याचेही प्राथमिक वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. मानखुर्द परिसरात शुक्रवारी सायंकाळी दोघांनाही शेवटचे पाहिल्याचे तेथील लोकांकडून सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या मोबाइलचीही तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभर त्यांचे फोनवरून ज्यांच्याशी बोलणे झाले त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मारेकऱ्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.