मुंबई – गोरेगावच्या दोन तरुणांचा नायगावच्या चिंचोटी धबधब्याजवळील डोहात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. डोहात पोहत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाण्यात वाहून गेले होते. पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघा तरूणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
गोरेगावच्या अशोक नगर काम इस्टेट परिसरात राहणाऱ्या सहा तरुणांचा एक गट सोमवारी सकाळी नायगाव येथील प्रसिध्द चिंचोटी धबधब्यावर सहलीसाठी आला होता. त्यात अमित यादव (१९) विलास कदम (१९), सुभाष सरकार (१९) पवन पांडे (१९) प्रल्हाद सहजरवा (२२) आणि सुशील डबाळे (२४) यांचा समावेश होता. हे सर्वजण गोरेगावच्या महाविद्यालयात शिकणारे होते. दुपारी ते धबधब्याच्या पुढे असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेले. त्यापैकी कुणाला पोहता येत नव्हते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. चौघे जण कसेबसे डोहाच्या बाहेर आले. मात्र प्रल्हाद सहजराव (२२) आणि सुशील डबाळे (२४) असे दोघे वाहून गेले.
तो भाग निर्जन असल्याने तेथे मदतीसाठी कुणी नव्हते. घटनेबाबत त्यांच्या मित्रांनी दुपारी एकच्या सुमारास महामार्गावरील बापाणे पोलीस चौकी येथे येऊन माहिती दिली. पाच तासांच्या शोध मोहीमेनंतर संध्याकाळी प्रल्हाद सहजराव आणि सुशील डबाळे यांचे मृतदेह हाती लागले.
आम्हाला माहिती मिळातच आम्ही अग्निशमन दलाच्या मदतीने घटनास्थळी जाऊन शोध घेतला. सुमारे ५ तास ही शोधमोहीम सुरू होती. संध्याकाळी ६ च्या सुमारास दोन्ही बेपत्ता तरुणांचे मृतदेह आढळले, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी सांगितले. मयत मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जुचंद्र येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. डोहातून बचावलेले अन्य ४ तरूण सुखरूप आहेत. चिचोंटी धबधबा हा धोकादायक असून तेथे मनाई आदेशाचे फलक लावण्यात आले आहे. तेथे दरवर्षी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येत असतो. सोमवारी नेमके पोलीस नसल्याने हे तरूण आतील डोहात पोहण्यासाठी गेले होते.