उद्धव ठाकरे यांचे केंद्र सरकारला आव्हान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा आणि राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला शनिवारी येथे दिले.

उद्धव ठाकरे पत्नी रश्मी, मुलगा आदित्य आणि निवडक समर्थकांसह दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार असेल किंवा अध्यादेश काढणार असेल तर शिवसेना पाठिंबा देईल, असे उद्धव यांनी सांगितले.

दिवस, महिने, वर्षेही उलटली आणि पिढय़ाही सरल्या परंतु राम मंदिर उभे राहिले नाही. आणखी किती वर्षे प्रतीक्षा करणार, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला. ‘अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. हा प्रश्न भावनेशी निगडित आहे. त्यामुळे रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधी केंद्र सरकारने कायदा करावा, असे उद्धव म्हणाले.

राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करणे अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत कठीण होते. परंतु आता केंद्रात भाजपचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे कायदा करा किंवा अध्यादेश काढा, शिवसेना पाठिंबा देईल, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख टाळून उद्धव म्हणाले, ‘आपण कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येत आलो आहोत. आजचा कुंभकर्ण चार वर्षे झोपेत आहे.’ मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नही बतायेंगे, अशी टीकाही त्यांनी केली. प्रथम मंदिर केव्हा बांधणार ते जाहीर करा, बाकीच्या गोष्टींवर नंतर बोलू, असे उद्धव म्हणाले. मी अयोध्येत प्रथमच आलो आहे, आता वारंवार येणार आहे. आपण राजकारण करण्यासाठी अयोध्येमध्ये आलेलो नाही, तर प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विहिंपच्या धर्मसभेआधी उद्धव अयोध्येत

वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी विहिंपने रविवारी अयोध्येत धर्मसभा आयोजित केली आहे. या सभेसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धर्मसभेसाठी हजारो लोक येतील, अशी आशा विहिंपच्या नेत्यांना आहे. उद्धव यांचा अयोध्या दौरा या धर्मसभेच्या एक दिवस आधीच सुरू झाला. त्यांनी आपण फक्त रामदर्शनासाठी आल्याचे स्पष्ट केले आहे.

राम मंदिर बांधण्याचे श्रेय आपल्याला नको. रामभक्त म्हणून आपण दर्शनासाठी येऊ. मंदिराच्या प्रश्नावर हिंदू आता शांत बसणार नाही.     – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray ayodhya ram temple
First published on: 25-11-2018 at 00:10 IST