शिवसेना नेहमीच भाजपच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. सत्ता आल्यावर आमच्या पदरात काही देत नाही; किमान धोंडे तरी टाकू नका, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘गोफ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याबरोबरच भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते.

हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर २५ वर्षे तुमच्यासोबत शिवसेना असताना तुम्हाला जरा अच्छे दिन आले आणि तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावताना व्यक्त केली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर निवडणूक जिंकणारा पहिला आमदार शिवसेनेचा होता, असेही ठाकरे यांनी नमूद केले. देश घडवणारे आता देशात उरलेले नाहीत. पण उपदेश करणारे खूप आहेत. आणि उपदेश करणारे जसे वागतात ते बघून धक्का बसतो, असे संजय राऊत यांच्या एका लेखात आहे. हीच सत्य परिस्थिती आहे. देशात तशा व्यक्तीच राहिलेल्या नाहीत, असे सांगत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आपल्या देशात जोवर हिंदुत्व टिकून आहे तोवर हुकूमशाही, यादवी कदापि येणार नाही. जे भाजपला सोडून गेले त्यांना जाऊ  दे, असे सुनील देवधर यांनी सांगितले.