राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने मुंबईतील अनेक रस्ते प्रकल्प रखडले आहे. मात्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या नवीन सरकारकडून हे प्रकल्प मार्गी लावले जातील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शहरातील रस्ते पाहणीनंतर सांगितले.
गेल्या वर्षी पावसात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला होता. पालिकेच्या रस्त्यांवर चौफेर टीका झाल्याने यावर्षी २० मे पूर्वी शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्यासाठी पालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी कामाला लागले होते. मात्र २० मे उलटून गेल्यावरही रस्त्यांची कामे सुरू असल्याचे दिसत होते. या पाश्र्वभूमीवर उद्धव यांनी रस्त्यांची पाहणी केली.
शहरातील रस्ते व पदपथांच्या कामांचे येत्या दोन वर्षांतील नियोजन पाहता सर्व रस्ते चांगले होतील व मुंबईकरांना अत्याधुनिक रस्त्यावरून प्रवास करता येईल. रस्त्यांच्या कामासाठी विविध विभागाच्या परवानगी मिळवणे पालिकेला क्रमप्राप्त असते मात्र या रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळत नाही. ही समस्याही सहा महिन्यांत नवीन सरकारमुळे सुटेल, असे ठाकरे म्हणाले.
या वर्षी सिमेंट काँक्रिटच्या २४ किलोमीटर रस्त्यांचे तर ३८ ते ४० किलोमीटर डांबरी रस्त्यांचे काम सुरू आहे. पालिकेच्या तीन वर्षांच्या मास्टर प्लॅननुसार हे काम सुरू असून रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडेच त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सोपवण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी दिली.
शहरातील सुभाषचंद्र बोस मार्ग, दिनशॉ वाच्छा मार्ग, ब्रीच कॅण्डी रुग्णालयासमोरील रस्ता, डॉ. ई मोझेस मार्ग, वरळी दूरदर्शनसमोरील मार्ग आणि हिंदमाता, शिंदेवाडी आदी मार्गाची उद्धव यांनी पाहणी केली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2014 रोजी प्रकाशित
रस्त्यांची वाट राज्य सरकारने रोखली
राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने मुंबईतील अनेक रस्ते प्रकल्प रखडले आहे. मात्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या नवीन सरकारकडून हे प्रकल्प मार्गी लावले जातील
First published on: 01-06-2014 at 04:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray glance at road repair works in the city