मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळलेली असताना करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने दिवाळीत मंदिरांसह कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, घरगुती स्वरूपात सण साजरा करावा, फटाक्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना व करोना होऊन गेलेल्या रुग्णांना धुराचा त्रास होण्याची भीती लक्षात घेऊन फटाके  टाळावेत आणि दिव्यांची आरास करून हा प्रकाशाचा उत्सव साजरा करावा, अशा विविध मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपडे, फटाके, दागदागिने इतर वस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये व रस्त्यांवर गर्दी होत आहे. यामुळेच करोनाचा धोका कायम असल्याने गर्दी टाळावी, अशी आठवण राज्य सरकारने करून दिली आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे. मुखपट्टीसह सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळावेत. तसेच दिवाळीत मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी के ली जाते. त्यातून ध्वनी आणि वायुप्रदूषणाची पातळी वाढते. करोना झालेल्या व होऊन गेलेल्या लोकांना फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढण्याची भीती आहे. त्यामुळे फटाके  टाळून दिव्यांची आरास करून दीपावली हा प्रकाशाचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दीपावली उत्सवाबाबत स्थानिक पोलीस, प्रशासन आणि महापालिका हे स्थानिक परिस्थितीनुसार नियम जाहीर करतील व ते बंधनकारक असतील, असेही गृह विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.