मनसेचे टोल आंदोलन ही निवडणुकीच्या तोंडावरील ‘राज’कीय नौटंकी असल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. रात्रीच्या काळोखात टोल नाके फोडणाऱ्यांचे ढोंग जनतेला कळले असून राजकारणातील या हवशे,नवशे आणि पावशांकडे लक्ष न दिलेलेच चांगले असा टोलाही उद्धव यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात जागोजागी मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके फोडून टोलविरोधातील आपला संताप व्यक्त केला. राज यांच्या या आंदोलनाला प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून ‘कुठ पेटलंय, टोल तर सुरुच आहे’, अशा शब्दात उद्धव यांनी मनसेच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.
निवडणूक आली की काही राजकीय पक्ष उगाच मर्दानगीचा आवा आणतात. कुठे एखादी टॅक्सी फोडून ‘परप्रांतीय हटाव’चा आवाज ऐकू आला की समजावे निवडणूक आली. एरवी जनतेच्या नावाने टांग वर करून झोपलेले पक्ष जागे झाले असून एक दोन टोलनाके तोडून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. राज्यात महायुती सत्तेवर आल्यास राज्य टोलमुक्त करू या महायुतीच्या घोषणेमुळे झोपाळू पक्षांच्या पोटात दुखू लागले व त्यांनी राज्यातील टोलनाक्यांवर दगडफेक करून श्रेय घेण्याचा उद्योग सुरु केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
टोल वसूल करणाऱ्या कंपन्या राजकारण्यांना थैल्या देतात आणि नाके ताब्यात ठेवतात. जनतेची यात ससेहोलपट होत असून राज्य टोलमुक्त करण्यासाठी सेना-भाजप वचनबद्ध आहे. महायुतीच्या ‘रोखठोक’ भूमिकेमुळे झोपी गेलेल जागे झाले आणि रात्रीच्या काळोखात टोल फोडण्याची राजकीय नौटंकी केली. पण हे एक दिवसाचे नाटक फाळ काळ चालणार नाही, असे सांगून यांच्या आंदोलनानंतर लगेचच टोल वसुली सुरु झाली यातच सारे कही आले असे सांगून मनसेचे आंदोलन हा फुसका बार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.