शिवसेना सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे असे सांगत सत्तेऐवजी सत्यासोबत राहा. भाजपसह सत्तेत भागीदार असलो तरी सातवा वेतन आयोग लागू करणे, ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, कामगारविरोधी कायदे आदी मुद्दय़ांवर आक्रमकपणे सरकारला धारेवर धरा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदार-खासदारांना दिला आहे. त्याचबरोबर लाट असतानाही स्वबळावर लढूनच मागील वेळी राज्यात निवडून आलो. आताही स्वबळाची भाषा उगाच केलेली नाही, असे सांगत शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत उद्धव यांनी दिले.

शिवसेनेच्या आमदार-खासदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील पंचतारांकित हॉटेलात झाली. त्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपविरोधाची धार आणखी तीव्र करत काँग्रेस-राष्ट्रवादीला बाजूला सारत शिवसेनेने प्रमुख विरोधी पक्षाची जागा व्यापण्याची रणनीती ठाकरे यांनी आखल्याचे चित्र आहे. स्वबळावर लढण्याची भाषा उगाच केलेली नव्हती. मागच्या वेळीही लाटेत आपण स्वबळावर निवडून आलो होतो. आताही कोणत्याही लाटेची चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगत स्वबळावर निवडणुका लढण्यास शिवसेना समर्थ असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशात कामगार कायद्यांच्या सुधारणांच्या नावाखाली कामगारांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम सुरू आहे. या धोरणांमुळे संघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या कमी होईल. असंघटित क्षेत्रातील कामगार वाढतील. हे कामगारविरोधी धोरण आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर सामान्य गुंतवणूकदार बँकांमध्ये एका खात्रीने पैसे ठेवतो. नीरव मोदीसारखे लोक हजारो कोटी रुपये बुडवून पळून जाणार असतील तर सामान्य गुंतवणूकदारांचे काय होणार, असा सवाल करत त्यांचे पैसे सुरक्षित राहावेत, यासाठी धोरणे आखण्यास केंद्राला भाग पाडा, असा आदेश ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

शेतकरी कर्जमाफी, सातवा वेतन आयोग, सामान्य गुंतवणूकदारांचे हित या प्रश्नांवर आक्रमक होण्याचा आदेश पक्षप्रमुखांनी दिला आहे. लोकप्रतिनिधी आक्रमकपणे सरकारला जाब विचारतील.

नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या