आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे बळकट करण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे सरकारवर जोरदार टीका करताना हिंदुत्वाचा मुद्दाही त्यांच्या प्रचारात अग्रभागी राहणार असे दिसू लागले आहे. मुंबईत शिवसेनेला एकही जागा जिंकता न आल्यामुळे गटप्रमुखांच्या मेळाव्याबरोबरच महापालिकेच्या माध्यमातून राबविलेले विविध आरोग्य प्रकल्प लोकांपुढे आणले जात आहेत. कंदिवली येथील शताब्दी रुग्णालयाचे उद्घाटन हा त्याचाच एक भाग आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर लगेचच राज्याच्या दौऱ्यावर जाऊन उद्धव यांनी शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर महायुतीचा पाया भक्कम करताना मनसेकडे टाळीसाठी हातही पुढे केला. मात्र टाळीला ‘टाटा’चे उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेची बांधणी अधिक भक्कम करून लोकसभेत चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले. मुंबईत गटप्रमुखांचा विशाल मेळावा घेतानाच महापालिकेच्या माध्यमातून होणारी कामे अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आदेश त्यांनी दिले. अमरावती, नाशिक, शिरूरसह शिवसेनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करून तेथील पक्षबांधणी भक्कम करण्यावर उद्धव यांनी भर दिला आहे. कोक णातील लोकसभा मतदार संघांवर लक्ष केंद्रित करताना मुंबईतील कोकणी माणूसाची नाळ सेनेशीच जोडण्याचे काम सुरू केले आहे. सेनेची ठाणी भक्कम करण्याचे काम उद्धव यांनी जोरात सुरू केल्यामुळे सेना नेते व कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचे सेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकासाठी काढलेल्या वटहुकूमाच्या पाश्र्वभूमीवर हिंदूंच्या श्रद्धेवर घाला येणार असेल तर विधेयकाला विरोध करण्याचे जाहीर करून, शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा कायम असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.