प्रसाद लाडांसाठी प्रतिनिधी म्हणून काम केल्याबद्दल आक्षेप
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी म्हणून आपले स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी काम केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना भाजपविरोधात दंड थोपटत असताना नार्वेकर यांनी भाजप उमेदवारासाठी इतकी सक्रीयता दाखवायची गरज नव्हती, अशी सेनानेत्यांची भावना असल्याचे समजते.
काँग्रेसचे नारायण राणे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन स्वतंत्र पक्ष काढला. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ते सहभागी झाले. त्यामुळे भाजपतर्फे त्यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू होताच शिवसेनेने राणे यांच्या उमेदवारीला ठाम विरोध केला. परिणामी काँग्रेस व राष्ट्रवादी असा प्रवास केलेले प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. यानंतर लाड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबाही जाहीर केला. भाजप व शिवसेनेचे संख्याबळ पाहता लाड यांचा विजय निश्चित होता.
निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजप आणि शिवसेना आमदारांची हॉटेल ताजमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर भोजनाच्या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे तसेच सेनेच्या ज्येष्ठ आमदारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकर यांनाच केवळ आपल्यासमवेत भोजनास बसण्याचे निमंत्रण दिले. त्यातूनच शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. यानंतर निवडणुकीच्या दिवशी उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेच्या वतीने आमदार बालाजी किणीकर आणि मिलिंद नार्वेकर तसेच भाजपच्यावतीने पराग अळवणी आणि गोपाळ दळवी यांनी काम पाहिले. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनीही मतमोजणी प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली.
काँग्रेस-राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्यावरून भाजपमधील निष्ठावंतांमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे. या सर्व प्रकरणात शिवसेनेने लाड यांना जरी पाठिंबा दिला असला तरी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत शिवसेनेच्या आमदारांनी सहभागी होऊ नये अशी उद्धव यांची भूमिका होती, असे सेनेच्या एका ज्येष्ठ आमदाराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
उद्धव ठाकरे हे गेले तीन दिवस कुटुंबीयांसमवेत महाबळेश्वर येथे गेले असताना मिलिंद नार्वेकर यांनी प्रसाद लाड यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारल्याचे कळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी ही नाराजी व्यक्त केली असून मिलिंद नार्वेकर यांना लाड यांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहण्यास कोणी सांगितले, असा सवालही उद्धव यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मी गेली दहा वर्षे शिवसेनेच्या उमेदवारांचा निवडणूक प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून काम पाहात आहे. एखाद्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून कोणी आयत्यावेळी नेमता येत नाही. ती एक प्रक्रिया असून आदल्या दिवशी लाड यांच्या विनंतीनुसार माझे आणि किणीकर यांचे नाव निवडणूक प्रतिनिधी म्हणून देण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची त्या अर्जावर स्वाक्षरीही आहे. निवडणुकीच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मी विधिमंडळात होतो. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माझी माहिती नाही.
– मिलिंद नार्वेकर, शिवसेना पक्षप्रमुखांचे सचिव
महाबळेश्वरला जाण्यापूर्वी युतीचा धर्म पाळा, असा स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यानुसारच शिवसेनेने सर्व सहकार्य केले. पक्षप्रमुखांनी नाराजी व्यक्त केल्याची मला तरी माहिती नाही
– आमदार सुनील प्रभू, पक्ष प्रतोद