आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह निर्माण व्हावा, यासाठी येत्या २३ जानेवारी रोजी राज्यातील तमाम शिवसैनिकांकडून मुंबईमध्ये शिवबंधनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईमध्ये ही माहिती दिली.
२३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते. त्याचे औचित्य साधून पक्षाने शिवबंधनाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या दिवशी राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांना शिवबंधनाचे धागेही बांधण्यात येणार आहेत. बांधण्यापूर्वी हे सर्व धागे २० जानेवारी रोजी तुळजाभवानीच्या चरणी ठेवले जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या कार्यक्रमात शिवसैनिकांना प्रतिज्ञाबद्ध करण्यात येईल, असेही ते म्हणाले.