केईएम रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या अरुणाचे तेथेच कार्यरत एका डॉक्टरशी सूत जुळले आणि ते दोघेही लग्नाचा विचार करत होते. मात्र काळाला काही वेगळेच अपेक्षित होते. २७ नोव्हेंबर १९७३च्या रात्री एका घटनेने अरुणाची सर्व स्वप्ने विरून टाकली. रुग्णालयाच्या तळघरातील एका खोलीत कपडे बदलत असताना सोहनलाल वाल्मीकी नावाच्या एका कंत्राटी कामगाराने तिच्यावर हल्ला केला. तिच्यावर बळजबरी करत असताना सोहनलालने तिचा लोखंडी साखळीने गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा थांबला. शिवाय मेंदूला पुरवठा करणाऱ्या पेशींना आणि मज्जारज्जूलाही गंभीर दुखापत होऊन तिच्या नजरेवर त्याचा परिणाम झाला. या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणजे अरुणा कोमामध्ये गेली.
याप्रकरणी पोलिसांनी सोहनलालविरोधात बलात्कार वा विनयभंगाचा आरोप ठेवणे दूर, परंतु केवळ चोरीचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचाच गुन्हा दाखल केला गेला. सोहनलालला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर चोरी आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खटलाही चालविला गेला. न्यायालयानेही त्याला चोरी आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
दुसरीकडे या घटनेने संतप्त पडसाद म्हणून मुंबईतील परिचारिकांनी संप पुकारला आणि या संपाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था उपलब्ध करण्याची जोरदार मागणी केली. पुढच्या काळात अरुणाला अन्यत्र हलविण्याचे पालिका प्रशासनाने प्रयत्न केला गेला. मात्र या वेळेसही परिचारिकांनी आपल्या या मैत्रिणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसत पालिका प्रशासनाचा डाव हाणून पाडला. अखेर पालिका प्रशासनाला माघार घ्यावी लागली.
१९७३ पासून अरुणा कोमामध्येच होती, पण जिवंतपणी तिला भोगाव्या लागत असलेल्या मरणयातनेतून तिची सुटका व्हावी याकरिता तिला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी अरुणाच्या वतीने तिची मैत्रीण व सामाजिक कार्यकर्ती पिंकी विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. तिचे शरीर कोणत्याही उपचाराला फारसा प्रतिसाद देत नसल्याने तिला इच्छामरण द्यावे, अशी मागणी विराणी यांनी याचिकेद्वारे केली होती.  
सर्वोच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०१० रोजी विराणी यांची याचिका दाखल करून घेत अरुणाच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश केईएम रुग्णालय प्रशासन आणि राज्य शासनाला दिले होते. त्यानंतर अरुणाची नेमकी वैद्यकीय स्थिती जाणून घेण्यासाठी २४ जानेवारी २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तीनसदस्यीय डॉक्टरांचे एक पथक स्थापन केले. या पथकाने अरुणाची वैद्यकीय पाहणी करून तिला तसेच ठेवण्याचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने अरुणाच्या वतीने विराणी यांनी केलेली इच्छामरणाची याचिका फेटाळून लावली. कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलेल्या रुग्णाला इच्छामरणाचीही परवानगी देऊ शकते. मात्र अरुणाची सध्याची स्थिती तशी नाही. रुग्णालयाच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे व इतर बाबींची पडताळणी केली असताना तिला इच्छामरणाची मान्यता देता येणार नसल्याचेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले होते. शिवाय रुग्णालय प्रशासनाकडून अरुणाची व्यवस्थित काळजी घेत असल्याचेही न्यायालयाने म्हटले. विशेष म्हणजे ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतर एवढी वर्षे अरुणाची अविरत काळजी घेणाऱ्या केईएममधील परिचारिकांनी आनंदोत्सव साजरा केला. या ४२ वर्षांमध्ये या केईएमचा तो वॉर्ड हे अरुणाचे घर आणि तिची काळजी घेणाऱ्या परिचारिकाच तिचे कुटुंब बनले होते.
दरवर्षी १ जून रोजी अरुणाचा वाढदिवसही उत्साहाने साजरा करायच्या. नोव्हेंबर २०११ मध्ये अरुणाला न्यूमोनिया झाला आणि तिची परिस्थिती खालावली. त्या वेळेस तिला चार दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर तिच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यावर तिला सर्वसाधारण वॉर्डमध्ये हलविण्यात आले. परंतु खरे तर त्याच वेळेपासून अरुणाची प्रकृती खालावत गेली. चार दिवसांपूर्वी पुन्हा तिची प्रकृती गंभीर होऊन तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आणि गेल्या ४२ वर्षांपासून जिवंतपणीच भोगत असलेल्या तिच्या मरणयातनांना सोमवारी पूर्णविराम मिळाला व तिची त्यातून अखेर सुटका झाली.

अरुणा शानबाग यांचे निधन झाल्यावर केईएममध्ये शोककळा पसरली. पालिकेने त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यावर दिवंगत भगिनी शांता नायक यांची कन्या मंगला व पुत्र वैकुंठ तसेच मंगला यांचा मुलगा सिद्धेश केईएममध्ये दुपारी आले. त्यांच्या सोबतीने भोईवाडा स्मशानभूमीत केईएमचे अधिष्ठाता डॉ. सुपे यांनी शानबाग यांना मुखाग्नी दिला.

बोरिवली येथील भगवती रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या नर्सिग कॉलेजला अरुणा शानबाग यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून पालिका सभागृहात नर्सिग कॉलेजच्या नामकरणाचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे तृष्णा विश्वासराव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘मृत्यूनेच तिची सुटका केली’
अरुणा शानबाग यांना इच्छामरण देण्यात यावे, अशी याचिका ‘अरुणाज स्टोरी’च्या लेखिका पिंकी विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दयामरणाची याचिका फेटाळून लावली. मात्र कायमस्वरूपी कोमात गेलेल्या रुग्णांसाठी ‘पॅसिव्ह युथेंशिया’ (रुग्णावरील उपचार बंद करत जीवरक्षक प्रणाली काढून घेऊन मृत्यूला परवानगी) देण्याची तरतूद न्यायालयाने मान्य के ली. अरुणा शानबाग यांच्या बाबतीत ‘पॅसिव्ह युथेंशिया’ची तरतूद उपयोगी पडणारी नव्हती. अरुणाच्या लढय़ामुळे आपल्याला इच्छामरणासंदर्भात मिळालेला हा मोठा विजय होता. एकप्रकारे तिने आपल्याला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. मात्र तिच्यासाठी प्रत्यक्षात आपण कोणीही काहीही मदत करू शकलो नाही, अशी खंत पिंकी विराणी यांनी बोलून दाखवली. अरुणा शानबागच्या निधनामुळे आपल्याला दु:खच झाले आहे. कितीतरी वर्षांपासूनचे हे दु:ख आहे. माझी अरुणा खूप दु:खी होती, तिला वेदना होत होत्या. एवढय़ा वेदना सहन करून आज इतक्या वर्षांनी मृत्यूने तिची सुटका केली, अशी भावना पिंकी विराणी यांनी व्यक्त केली.

परिचारिकांचे सेवाव्रत
खास प्रतिनिधी, मुंबई : दररोज हजारो रुग्णांचा प्रवेश होत असलेले केईएम नेहमीच गजबजलेले असते. जुन्या इमारतीच्या तळमजल्यावरील वॉर्ड क्रमांक चार हादेखील त्यापैकीच. याच वॉर्डच्या एका बाजूला असलेल्या खोलीत अरुणा शानबाग सुमारे ४० वर्षे होत्या. बाहेरच्या वर्दळीपासून वेगळ्या असलेल्या या खोलीत अरुणा यांच्या वेदनामय आयुष्याला परिचारिकांच्या सेवेची किनार लाभली.  
अरुणा यांच्यावर हल्ला झाला तेव्हा जन्मही न झालेल्या मुली आज केईएममध्ये परिचारिका म्हणून काम करत आहेत. अरुणा शानबाग यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकारी परिचारिकांनी त्या काळात आंदोलन करून शानबाग यांना केईएममध्ये आणण्यास भाग पाडले. या सहकारी कालपरत्वे निवृत्त झाल्यावरही पुढील पिढय़ातील परिचारिकांनी हे सेवाव्रत कायम ठेवले. नर्सेस वेल्फेअर सोसायटी, रुग्णालयातील मदतनिधी तसेच दात्यांकडून येत असलेल्या पैशांमधून अरुणा यांची सेवा सुरू होती, त्याचा भार रुग्णालयावर पडत नव्हता, असे मेट्रन अरुंधती वेल्हाळा म्हणाल्या. नेहमी रुग्णालयातून फेरी मारताना अरुणा यांच्या खोलीत त्या सहज डोकावत.गेल्या वर्षी अरुणा शानबाग यांची तब्येत खालावून त्यांना केवळ नलिकेतून अन्न देण्याची वेळ येईपर्यंत रोज सकाळचा नाश्ता त्यांना देण्यात येत असे. त्यांच्यासाठी जुनी गाणी लावली जात होती. खोलीत अनोळखी व्यक्ती गेल्यावर त्या किंचाळत किंवा सुरुवातीला स्पजिंग करतानाही भीती वाटे, अशा आठवणी अनुराधा पराडे यांनी सांगितल्या. परिचारिकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालेल्या अरुणा शानबाग यांच्या जाण्याने केईएममधील निव्वळ एक खोलीच रिकामी झालेली नाही तर परिचारिकांनी अनेक वर्षे हृदयात जपलेला हळवा कोपराही रिता झाला आहे. अरुणा यांच्या खोलीत डोकावल्यावर कोणीही दिसणार नाही, याची चुटपुट परिचारिकांना लागली आहे.

आता वाढदिवस येणार नाही
* दरवर्षी अरुणा यांचा वाढदिवस १ जून रोजी साजरा केला जात असे. त्याची तयारी १५  दिवस आधीपासून सुरू होत असे.
* खोलीचे पडदे बदलणे, सोनचाफ्याची फुले, केक आणणे, आंबे देणे, आवडीचे मासे करणे यासाठी परिचारिका स्वत: खर्च करत.
* गेल्या वर्षांपासून अरुणा यांची तब्येत खालावली असली तरी वाढदिवस साजरा करण्यात खंड पडला नाही.
* या वेळीही न्युमोनियातून बरे होण्याची आशा वाटत असल्याने परिचारिकांनी तयारीही सुरू केली होती, मात्र आता तो दिवस कधीही येणार नाही, याची रुखरुख प्रत्येकीच्या चेहऱ्यावर होती.
* अरुणा शानबाग यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी परिचारिकांकडून करण्यात आली.

द या म र ण . . .
* अंथरुणाला खिळून असलेल्या, कोणताही संवाद साधण्याची शक्ती गमावलेल्या अरुणा शानबाग २०११ मध्ये देशभरात पुन्हा चर्चेचा विषय ठरल्या.
* जिवंतपणीच मरणयातना भोगत, ३७ वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या शानबाग यांना दयामरण देऊन त्यांची त्रासातून सुटका करावी यासाठी पिंकी विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
* अ‍ॅक्टिव्ह युथेंशिया (एखाद्या औषधाच्या किंवा इंजेक्शनमधून रुग्णाचे जीवन संपवणे) आणि पॅसिव्ह युथेंशिया (जीवरक्षक प्रणाली व उपचार बंद करून) इच्छामरण देण्याचा निर्णय अपवादात्मक स्थितीत न्यायालय घेऊ शकते.
* मात्र रुग्णालयाच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे व इतर बाबींची पडताळणी केली असता शानबाग यांना इच्छामरणाची मान्यता देता येणार नाही, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
* केईएमच्या डॉक्टरांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. आतापर्यंत केईएमच्या परिचारिका सेवा करत आल्या आहेत. त्यापुढेही शानबाग यांची सेवा करत राहतील, अशी भूमिका तेव्हाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांनी मांडली होती.

अंत्यविधीचा वाद
अरुणा शानबाग यांना बाळकृष्ण, गोविंद व आनंद हे तीन भाऊ आणि शांता, शालिनी या दोन बहिणी होत्या. त्यांच्या आईवडिलांचे पूर्वीच निधन झाले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नातेवाईकांपैकी कोणीही अरुणाची जबाबदारी घेण्यासाठी त्याकाळी पुढे आले नाही. परळमध्येच राहणारी मोठी बहीण शांता नायक यांनी काही वर्षे रुग्णालयात फेऱ्या मारल्या. वृद्धापकाळाने दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. इतर भावंडांपैकीही आता कोणी हयात नाही. केईएमच्या परिचारिकांनी अरुणा शानबाग यांना स्वतच्या कुटुंबातील मानले. मात्र त्यांच्या अन्य नातेवाईकांपैकी कोणीही एवढय़ा वर्षांत त्यांना भेटायला आले नव्हते. सोमवारी सकाळी अरुणा शानबाग यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या बहिणीची मुलगी मंगला, मुलगा वैकुंठ व मंगला यांचा मुलगा सिद्धेश केईएममध्ये आले. मात्र एवढय़ा वर्षांत एकदाही भेटायला न आलेल्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करू देण्यास परिचारिकांनी सुरुवातीला नकार दिला. नंतर मात्र शानबाग यांच्या भाच्यासह केईएमच्या अधिष्ठात्यांनी एकत्र अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. गौड सारस्वत ब्राह्मण सेवामंडळाच्या सदस्यांनी स्वेच्छेने अंत्यसंस्काराला मदत केली.

अरुणा शानबाग यांची मृत्यूशी चाललेली वेदनामय झुंज अखेर संपली. या सर्व प्रकरणात केईएमच्या परिचारिकांनी केलेली सेवा ही मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक आहे.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</strong>
******
शानबाग यांच्या वाटेला वेदनादायी आयुष्य आले. या काळात सदैव त्यांच्यासोबत राहिलेल्या केईएमच्या परिचारिकांच्या सेवावृत्तीला सलाम .
    – डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री
******
अरुणा शानबाग यांच्यावरील हल्ला व त्यानंतर त्यांच्या वाटेला आलेले आयुष्य वेदनादायक आहे. या काळात पालिकेच्या केईएम रुग्णालयाने त्यांची पूर्ण काळजी घेतली.
    – महापौर स्नेहल आंबेकर
******
अनेक वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या अरुणा शानबाग यांच्याबाबत असे कधी ना कधी घडणार याची कल्पना होती. मात्र या दरम्यान तिची काळजी घेताना परिचारिकांनी अलौकिक आदर्श घालून दिला आहे.
– डॉ. संजय ओक, माजी अधिष्ठाता, केईएम.
******
शानबाग यांच्याशी संबंधित खटल्याची फाइल न्यायालयीन आदेशाशिवाय पुन्हा उघडली जाणार नाही. यासाठी एखादी संस्था न्यायालयात गेली तर सरकार जरूर सहकार्य करील, असे राज्य सरकारने म्हटले आहे.