विद्यापीठ परीक्षांबाबत असहकाराचे धोरण अवलंबणाऱ्या आंदोलनकर्त्यां प्राध्यापकांबाबत बहुतांश प्राचार्यानी नरमाईचे धोरण अवलंबल्याने आता मुंबई विद्यापीठाने प्राध्यापकांवर दबाब आणण्यासाठी संस्थाचालकांनाच साकडे घालायचे ठरविले आहे.
प्राध्यापकांच्या सहकार्याशिवाय परीक्षा घेणे शक्य नसल्याचे ‘तृतीय वर्ष विज्ञान’ शाखेच्या (बीएससी) प्रात्यक्षिक परीक्षांवरून विद्यापीठाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे, दोन आठवडय़ांपूर्वी विद्यापीठाने प्राचार्याची बैठक बोलावून त्यांनी प्राध्यापकांवर परीक्षेच्या कामात सहभागी होण्याबाबत दबाव आणावा, अशी मागणी केली होती. परंतु, बहुतांश प्राचार्यानी आंदोलनकर्त्यां शिक्षकांवर कारवाई करण्यास असमर्थता दर्शविल्याने आता विद्यापीठाने संस्थाचालकांनाच बैठकीसाठी पाचारण केले आहे. वेतनविषयक मागण्यांसाठी ‘एमफुक्टो’ या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली ‘बॉम्बे युनिव्र्हसिटी अॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन’ (बुक्टू) या मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संघटनेने विद्यापीठाच्या परीक्षाविषयक कामावर बहिष्कार टाकला आहे. सुमारे चार हजार प्राध्यापकांचा बहिष्कार असूनही विद्यापीठाने १ मार्चपासून बीएस्सीच्या विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या १८ दिवसात केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात विद्यापीठाला यश आले आहे. काही केंद्रांवर तर प्राध्यापकांअभावी नियम धाब्यावर बसवून परीक्षा उरकण्यात येत आहेत. आता २८ मार्चपासून विद्यापीठाची टीवायबीकॉम ही सर्वात मोठी परीक्षा सुरू होते आहे. पण, प्राध्यापकांचा असहकार सुरूच राहिल्यास ही परीक्षा घ्यायची कशी असा विद्यापीठासमोर प्रश्न आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी असहकार पुकारणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखण्यापासून कडक कारवाई करण्याचे इशारे देऊन देखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकल्या नाहीत, तिथल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अन्य महाविद्यालयांमध्ये (जिथे परीक्षा सुरळीतपणे पार पडत आहेत) घ्याव्या, हा पर्याय विद्यापीठाने आजमावायचा ठरविला होता. मात्र, हा तोडगा व्यावहारिक नसल्याचे लक्षात आल्यामुळे तो गुंडाळून ठेवावा लागला. दरम्यानच्या काळात प्राचार्यानी शिक्षकांवर कारवाई करावी म्हणून विद्यापीठाने प्राचार्याचीही बैठक घेतली. मात्र, प्राध्यापकांवर कारवाई करण्यास आपण असमर्थ असल्याचे बहुतांश प्राचार्यानी या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे, आता संस्थाचालकांनाच विद्यापीठाने पाचारण केले आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी या माहितीला दुजोरा देत, ज्या ठिकाणी शिक्षकांच्या आंदोलनाचा मोठा परीणाम जाणवतो आहे अशा ६६ महाविद्यालयाच्या संस्थाचालकांची बैठक मंगळवारी विद्यापीठाने बोलाविली आहे, असे सांगितले.
तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक
राज्यातील प्राध्यापकांच्या संपाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दालनात बैठक घेण्यात येईल व प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत जाहीर केले.
प्रात्यक्षिक परीक्षा केवळ ३० टक्केच
या वर्षी तब्बल १,६०० विद्यार्थी बीएस्सी प्रात्यक्षिक परीक्षा देणार होते. प्रत्येक विषयाच्या सहा ते सात परीक्षा गृहीत धरता यंदा तब्बल ९हजार ६०० प्रात्यक्षिक परीक्षा व्हायला हव्या होत्या. मात्र, यापैकी केवळ ३० टक्के प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात विद्यापीठाला यश आले आहे. सोमवारीही ७९ परीक्षा केंद्रांपैकी ५१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होऊ शकल्या.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2013 रोजी प्रकाशित
आंदोलनकर्त्यां प्राध्यापकांवर कारवाई करा
विद्यापीठ परीक्षांबाबत असहकाराचे धोरण अवलंबणाऱ्या आंदोलनकर्त्यां प्राध्यापकांबाबत बहुतांश प्राचार्यानी नरमाईचे धोरण अवलंबल्याने आता मुंबई विद्यापीठाने प्राध्यापकांवर दबाब आणण्यासाठी संस्थाचालकांनाच साकडे घालायचे ठरविले आहे.
First published on: 19-03-2013 at 04:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University demand college to take action against strict teacher