कल्याणमधील अन्सारी चौकात पाणीपुरी खाण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन गतिमंद मुलाबरोबर याच भागातील चार तरुणांनी अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या तरुणांनी मुलाला विद्रूप करून मारहाणही केली. पोलीस ठाण्यात निघालेल्या त्याच्या वडिलांनाही मारहाण केली आहे. या प्रकरणातील तीन तरुणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. रामू मोंडकर, तौसिफ गनियन आणि तौसिफ रईस या तिघांना अटक करण्यात आली आहे. बाजारपेठ विभागातील रोहिदासवाडय़ातील चौदा वर्षांचा गतिमंद मुलगा पाणीपुरी खाण्यासाठी अन्सारी चौकात आला होता. तेथे असलेल्या या चौघांनी गतिमंद मुलाला उचलून बाजूच्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन  त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या मुलाने प्रतिकार करताच त्याला बेदम मारहाण केली.  मुलाने घरी हा प्रकार सांगताच त्याचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल जाण्यासाठी निघाले. तेव्हा वाटेत याच टोळक्याने त्यांना मारहाण केली. शुक्रवारी रात्री याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.