तळोजा तुरुंगात पुन्हा पिस्तूल पाठवण्याचा प्रयत्न फसला आहे.  कैद्याकडे कपडय़ामधून देण्यात आलेले पिस्तूल आणि पाच गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा जेलमधून अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयात सात आरोपींना आणण्यात आले होते. यात २०१२ मधील पनवेलमधील खून खटल्यातील आरोपी अमित कैकाडीचा समावेश होता. सुनावणी संपल्यावर या सर्व आरोपींना पोलीस व्हॅनमध्ये नेले जात होते. याच वेळी एका अज्ञात व्यक्तीने अमित कैकाडी याला कपडय़ाची पिशवी आणून दिली. पोलिसांनी तपास केला तेव्हा या पिशवीत कपडय़ांच्या आत एक पिस्तूल आणि पाच बंदुकीच्या गोळ्या तसेच काही चित्रपटांच्या सीडीज असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पिशवी आणणाऱ्याचा तपास सुरू केला. मात्र ती व्यक्ती पसार झाली.