राज्यात गारपिटीची शक्यता

दिवाळी उलटून आठवडा लोटला तरी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-ठाणेकरांवर शनिवारी दुपारी अवकाळी सरी कोसळल्या. अरबी समुद्रात कोकण किनाऱ्यानजिक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यभरात शनिवारी ढगाळ वातावरण होते. या क्षेत्राच्याच प्रभावामुळे मुंबईची उपनगरे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई तसेच रायगड, नाशिक परिसरात जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून, रविवार व सोमवारी गारपीट होण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. ढगांच्या आच्छादनामुळे किमान तापमानातही वाढ झाली असली तरी गारपीट झाल्यास थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
ईशान्य मान्सूनच्या वाऱ्यांसोबत भारताच्या दक्षिण टोकावर मोठय़ा प्रमाणात आलेले बाष्प अरबी समुद्रात मध्यभागी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे ओढले गेले आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये ढगाळ वातावरण आहे. याच क्षेत्राच्या प्रभावामुळे मुंबई उपनगरे, ठाणे-डोंबिवलीसह कल्याण, अंबरनाथ, बदलापूर परिसरात दुपारी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा आला. थंडीमध्ये काही वेळा गारपीट होण्याची शक्यता असली तरी नोव्हेंबर महिन्यात गारपीट होण्याचा प्रकार अपवादात्मक आहे. गेल्या वर्षीही नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गारपिटीने मार्चपर्यंत मुक्काम ठोकला होता.

किमान तापमानात वाढ
ढगाळ वातावरण असल्याने मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानात शनिवारी एक ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली. मुंबईत सांताक्रूझ येथे २३.४ अंश से. तापमान नोंदले गेले. नागपूर व गोंदियाला सर्वात कमी म्हणजे १४.४ अंश से. तापमान होते, नाशिक येथे १६.४ तर पुण्यात २०.१ अंश से. तापमानाची नोंद झाली. कोकणातील किमान तापमानात फारसा फरक पडणार नसला तरी मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ात गारपीट झाल्यास किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
खबरदारी घेण्याचे आवाहन
पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार, मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व िहगोली या जिल्ह्य़ांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गारपीट सुरू असताना घराबाहेर पडण्याचे टाळावे, दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावी, कापणी झालेले धान्य उघडय़ावर ठेवू नये, असे आवाहन राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. गारपिटीनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज असल्याने थंडीपासून बचाव करण्याची खबरदारी घ्यावी तसेच विजेच्या तारा तुटण्याची भीती लक्षात घेऊन त्यापासून दूर राहावे, असेही सांगण्यात आले.

आजही सरींचा अंदाज
हवामानाची ही स्थिती दोन दिवस कायम राहणार
कोकणात काही ठिकाणी तुरळक सरी होतील.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याचा अंदाज
कुलाबा १.५, सांताक्रूझमध्ये ०.४ मिमी पावसाची नोंद