रात्रीचा मीट्ट अंधार.. किनाऱ्याच्या चहूबाजूने पडलेला सोनरेशमी प्रकाश.. लाटांचा नाद.. वाऱ्यावर हेलकावणारी नाव.. याच सोबतीला पाण्यावर जादूई निळ्या रंगात लखलखणारा प्रकाशझोत.. याच पाण्यात पाय टाकताच आकाशातील पसरलेल्या चांदण्याच्या स्पर्शाने जणू काही अंग शहारून जावे, असा काहीसा अनुभव रविवारी मुंबईच्या जुहू चौपाटीवर तीन विद्यार्थ्यांना आला.
छायाचित्रात समुद्रावर निळ्या रंगाच्या ‘निऑन लाइट’प्रमाणे पसरलेला प्रकाशझोत हे एखाद्या इंग्रजी अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचे दृश्य नसून खोल समुद्रातील ‘फायटोप्लॅटॅन’ने एकत्र गर्दी केल्याने हा प्रकाश झाला आहे. मात्र फायटोप्लॅटॅन नेमके आहे तरी काय, असा प्रश्न हा प्रकाश पहिल्यांदाच पाहणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना पडला. त्यांनी तातडीने आपल्या शिक्षकांना याची माहिती भ्रमणध्वनीहून कळवली. त्यानंतर या जिवाणूच्या जातीचा शोध घेण्याचे कार्य सुरू झाल्याचे भवन्स महाविद्यालयात प्राणिशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या नीलेश माने याने सांगितले.
जुहू कोळीवाडा येथे राहत असलेल्या सायली भालेकर हिने गेल्या रविवारी भवन्स महाविद्यालयात प्राणिशास्त्र या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अभी जैन (२०) आणि नीलेश माने (२२) या आपल्या दोन मित्रांना भ्रमणध्वनीहून जुहूच्या किनाऱ्यावर निऑन लाइटप्रमाणे प्रकाश पडल्याचे कळवले. यावर तिच्या मित्रांनी तिची मस्करी करून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सायलीने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना एक छोटी चित्रफीत पाठवली. ती चित्रफीत बघताच भवन्स महाविद्यालयात शिकत असलेल्या त्या विद्यार्थ्यांनी तातडीने जुहू चौपाटी गाठले. त्या निळ्या प्रकाशाचे काही छायाचित्र काढले आणि शिक्षकांनाही कळवले.
त्यानंतर त्यांनी हा प्रकाश नेमका का पडतोय याचा शोध घेण्याचे ठरविले. यात त्यांना खोल समुद्रात असणाऱ्या ‘फायटोप्लॅटॅन’ची ही एक जात असल्याचे लक्षात आले. खोल समुद्रात जेव्हा काही बदल होतात. तेव्हा मोठय़ा लाटेसोबत हे जिवाणू समुद्रकिनारी येतात. यात असंख्य प्रकार आहेत. त्यामुळे हा प्रकार नेमका कोणता याबाबत अभ्यास करावा लागेल, परंतु आम्ही पाहिलेला हा जिवाणू ५०० मायक्रोमीटर इतका लहान होता. हे जिवाणू रात्रीच्या अंधारात चमकताना दिसतात. आपल्या बचावासाठी किंवा अन्न शोधण्यासाठी त्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण करतात. पण यात असंख्य प्रकार आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास केल्यानंतरच त्याची माहिती मिळू शकेल, असे नीलेश आणि अभी या विद्यार्थ्यांनी सांगितले.
शुक्रवारपासून ते जिवाणू या भागात होते. आम्ही ते रविवारीच पहिल्यांदा पाहिले. त्यापूर्वी दोन दिवस येथील स्थानिकांनी ते पाहिले होते. मुंबईत याची आतापर्यंत तरी नोंद नाही. ते दृश्य अद्भुत होते. अविस्मरणीय क्षण होता. कल्पनेच्या पलीकडेही निसर्गात काही तरी असू शकते याची जाणीव झाली. ‘लाइफ ऑफ पाय’मध्ये जसा एक प्रसंग आहे. तशाच प्रकारे दिसले, हे सांगताना नीलेशच्या डोळ्यांत चमक दिसली.
ते नेमके आहेत तरी कोण?
‘फायटोप्लॅटन’मध्ये अनेक प्रकार आहेत. सर्वसाधारण सांगायचे झाल्यास या जिवाणूमध्ये हरित द्रव्ये असतात. त्यांना जगण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्यामुळे ते दिवसा समुद्रात पाण्यावर तरंगतात. इतर वेळी खोल समुद्रात असतात. नायट्रेड, फॉस्फर, सल्फरचे रूपातंर ते प्रथिन, कबरेदके आणि मेदमध्ये करतात. ते समुद्रसाखळीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अनेकदा समुद्रातील छोटय़ा जलचर प्राण्यांना ते अन्न पुरवितात. ते कधी कधी इतर जलचर प्राण्यांना धोकादायक ठरू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.