माहितीपर, मार्गदर्शनपर, धार्मिक पुस्तकांना अधिक मागणी; आठ नामांकित प्रकाशकांची वार्षिक उलाढाल २२ कोटींच्या घरात
जागतिक पुस्तक दिन
कथा, कादंबऱ्यांच्या वाचनातून मिळणारा आनंद कितीही मोठा असला तरी त्याच्या पुनर्वाचनात तितकासा रस उरत नाही. बहुधा यामुळेच चोखंदळ मराठी वाचकांचा कल माहिती, मार्गदर्शनपर, धार्मिक, शैक्षणिक, पाककला, ज्योतिषविषयक अशा दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांच्याच खरेदीकडे वाढत चालला आहे. गेल्या काही वर्षांत अशा पुस्तकांची मागणी वाढू लागल्याने विविध प्रकाशन संस्थांनीही ‘उपयुक्त’ पुस्तकांच्या प्रकाशनावर भर दिला आहे. याचा परिणाम म्हणून की काय, मराठीतील केवळ आठ प्रकाशकांची वर्षिक उलाढाल २२ कोटींच्या घरात पोहोचली असून गेल्या तीन-चार वर्षांत हे प्रमाण २० ते २५ टक्क्य़ांनी वाढले आहे.

सध्या मराठीत माहितीपर, मार्गदर्शनपर, धार्मिक, शैक्षणिक, पाककला, ज्योतिषविषयक, प्रेरणादायी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य अशा पुस्तकांना प्रचंड मागणी वाढ आहे. त्यामुळे अनेक प्रकाशकांकडूनही या प्रकारातील पुस्तकांच्या प्रकाशनावर भर दिला जात आहे. यात तंत्रज्ञानामुळे इतिहासापासून ते अगदी फॅशन डिझायनिंगपर्यंत लाखों वाचकांना एका क्लिकवर पुस्तके उपलब्ध होत आहेत. तसेच पुस्तकांवर मोठय़ा प्रमाणात सवलती दिल्या जात असल्याने मराठी पुस्तकांची मागणी वाढत आहे.
पुस्तकांच्या जाहिराती वाढत असून वर्षभरात कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रदर्शनाची संख्याही वाढत आहे. त्यामुळे मराठी पुस्तक खरेदीकडे वाचक अधिक वळत आहे. केवळ प्रदर्शन बघायला जाणारे लोकही एखादे पुस्तक का होईना खरेदी करत आहेत.
‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त ‘मौज प्रकाशन गृह’, ‘मॅजेस्टिक प्रकाशन’, ‘लोकवाड्मय गृह’, ‘पॉप्युलर प्रकाशन’, ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’, ‘मेहता’, ‘राजहंस प्रकाशन’ आणि ‘ग्रंथाली प्रकाशन’ या आठ प्रकाशकांच्या वर्षिक उलाढालाचा आढावा घेतला असता या प्रकाशन संस्थांची वार्षिक उलाढाल २२ कोटींवर पोहोचल्याचे दिसून आले. यातही मोठा वाटा माहितीपर पुस्तकांच्या विक्रीचा असल्याचे समजते.

पुस्तकांच्या विक्रीत नक्कीच वाढ होत असल्याने प्रकाशकांची उलाढालही काही प्रमाणात वाढत आहे. यात गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने वाचकांपर्यंत अधिक पुस्तके पोहोचत आहेत. तसेच सध्या वाचक माहितीपर, मार्गदर्शनपर, आणि पाककला विषयांची पुस्तके जास्त प्रमाणात वाचत आहेत.
-अशोक कोठावळे, मॅजेस्टिक

मराठी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचत नाही, अशी ओरड नेहमीच केली जाते. त्यामुळे केवळ प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्हे तर ग्रामीण भागात रथाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचवत आहोत. याला वाचकही मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे पुस्तकांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
-राजन बावडेकर, लोकवाङ्मय गृह