|| प्रसाद रावकर

मुंबई : मरिन ड्राइव्ह येथे तब्बल ९० लाख रुपये खर्च करून उभारलेले सौरऊर्जा आणि व्हॅक्यूम तंत्रज्ञानावर आधारित पंचतारांकित सार्वजनिक प्रसाधनगृह अवघ्या तीन वर्षांतच बंद करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली होती. आता व्हॅक्यूम तंत्रज्ञानाला सोडचिठ्ठी देत या प्रसाधनगृहाचे नूतनीकरण करण्यात येत असून येत्या १५ दिवसांत पुन्हा या प्रसाधनगृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा संख्येने देश-विदेशातील पर्यटक येत असतात. तसेच सकाळी आणि संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर व्यायाम अथवा फेरफटका मारण्याच्या निमित्ताने अनेक जण येत असतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर नागरिकांची वर्दळ असते. या भागात प्रसाधनगृह नसल्याने तेथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यालगत पंचतारांकित सार्वजनिक प्रसाधनगृह बांधण्याचा निर्णय पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने घेतला होता.

जिंदाल ग्रुप आणि समाटेक फाऊंडेशनने पुढाकार घेऊन पालिकेला ते उभारून दिले. या प्रसाधनगृहासाठी तब्बल ९० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. व्हॅक्यूम तंत्रज्ञानावर आधारित या प्रसाधनगृहात सौरऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. प्रसाधनगृहातील पाचपैकी तीन शौचकूपे पुरुषांसाठी, तर दोन शौचकूपे महिलासाठी राखीव होती. या प्रसाधनगृहासाठी स्टीलचा वापर करण्यात आला होता. तसेच समुद्राच्या खाऱ्या हवेमुळे ते गंजू नये यासाठी त्यावर विशिष्ट प्रकारच्या रंगाचा मुलामाही देण्यात आला होता. मात्र अल्पावधीतच प्रसाधनगृहासाठी वापरलेल्या स्टीलला गंज चढला. तसेच पाण्याच्या कमी वापरामुळे परिसरात दरुगधी पसरू लागली होती. अखेर हे प्रसाधनगृह काही काळ बंद करावे लागले होते.

मलवाहिनीसाठी ‘मायक्रोटनेलिंग’  नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची

जा-ये सुरू असते. प्रसाधनगृह आणि मुख्य मलवाहिनीमधील अंतर साधारण १०० मीटर आहे. त्यामुळे प्रसाधनगृह मलवाहिनीला जोडण्यासाठी मायक्रो टनेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे काम हाती घेण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर

या प्रसाधनगृहाच्या नूतनीकरणासाठी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नूतनीकरणाअंतर्गत प्रसाधनगृहात उत्तम दर्जाच्या लाद्या, बेसिन, शौचकूप, नळ आदी बसविण्यात आले आहेत. दरुगधीचा धोका लक्षात घेऊन नूतनीकरणामध्ये व्हॅक्यूम तंत्रज्ञानाला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. आता अन्य सार्वजनिक शौचालयांप्रमाणेच या प्रसाधनगृहात स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. पूर्वी येथे लहान सेफ्टी टँक बसविण्यात आली होती. आता तेथे तात्पुरत्या स्वरूपात अधिक क्षमतेची सेफ्टी टँक बसविण्यात येणार आहे.

मरिन ड्राइव्ह येथील प्रसाधनगृहाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात येईल. त्यामुळे पर्यटक आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही. -शिवदास गुरव,  साहाय्यक आयुक्त, ए विभाग