वर्सोवा-घाटकोपर मेट्रो रेल्वे अपेक्षेपेक्षा खूपच लांबल्याचे मान्य करीत जेव्हा प्रकल्प लांबतो, तेव्हा खर्चही वाढतो, असे स्पष्ट करणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रो रेल्वेच्या सध्या निश्चित केलेल्या दरात वाढ होणार का, याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र रेल्वेच काय, परंतु टोल किती असावा यावर नियंत्रण असले पाहिजे व त्यासाठी आपण केंद्र सरकारशी चर्चा करून नियामक नेमण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वर्सोवा-घाटकोपर मेट्रो रेल्वेचा वर्सोवा- साकीनाक्यापर्यंतचा पहिला टप्पा सप्टेंबपर्यंत तर संपूर्ण प्रकल्प डिसेंबपर्यंत कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून संपूर्ण परवानगी मिळाल्याशिवाय मेट्रो रेल्वे सुरू करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुका जवळ आल्यामुळे घाईघाईत चाचणी उरकल्याचा मुख्यमंत्र्यांनी इन्कार केला.
 नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. पुणे, नागपूर येथेही मेट्रो प्रकल्प राबविला जाणार आहे. घाटकोपर ते ठाणे अशी मेट्रो रेल्वे प्रस्तावीत आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वे लवकरच खुला होणार आहे. न्हावाशेवा – शिवडी ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प तसेच रेल्वेचा चर्चगेट ते विरार हा उन्नत रेल्वे प्रकल्प आदींमुळे मुंबईतील वाहतुकीचा चेहरामोहरा पार बदलणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईत रोजीरोटीसाठी लाखो लोक दूरवरून येत असतात. त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी ही वाहतूक यंत्रणा खूपच उपयोगी पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकल्पांमध्ये खासगी सहभाग किती असावा, याचा भविष्यात प्रकल्प राबविताना पुनर्विचार केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.