वसई-विरार महापालिका निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत असून, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी १०० जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. इतर राजकीय पक्षांना फार अपेक्षा दिसत नाही.
मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. ११५ पैकी १०० जागा जिंकू, असा  विश्वास बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेने कितीही प्रयत्न केले वा सत्तेचा दुरुपयोग केला तरीही वसईकर जनतेने बहुजन विकास आघाडीलाच कौल दिल्याचा दावा ठाकूर यांनी केला. शिवसेना व विशेषत: रामदास कदम यांनी आपल्याविरुद्ध प्रचारात पातळी सोडल्याने त्याची उलटी प्रतिक्रिया उमटेल, असे ठाकूर यांचे म्हणणे आहे. गेल्या वेळी आमचे तीन नगरसेवक होते. यंदा ३० पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी व्यक्त केला.