वसई : वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात बहुतांश भागात कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. महापालिकेकडून हा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे तयार होऊ लागले आहेत. सातत्याने असे प्रकार घडत असल्याने नागरी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
वसई विरार शहरात पालिकेच्या घनकचरा विभागाकडून दैनंदिन स्वच्छता केली जाते. व जमा झालेला कचरा पालिकेच्या क्षेपणभूमीवर नेऊन टाकला जातो. मात्र शहराच्या वाढत्या लोकसंख्ये सोबतच दैनंदिन कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आता हा कचरा थेट उघड्यावर टाकून देण्याचे प्रमाण ही शहरात वाढू लागले आहे. यात विशेषतः नालासोपाराच्या संतोष भवन, धानिव, गावराईपाडा, नायगाव उमेळा रस्ता, वसई पूर्व मुख्य रस्त्यालगत यासह अन्य भागात हा कचरा टाकला जात आहे. वेळेत हा कचरा उचलला जात नसल्याने हळूहळू त्याचे ढिगारे तयार होऊ लागले आहेत.
या कचरा कुजून आजूबाजूच्या परिसरात याची दुर्गंधी पसरत असते.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
दैनंदिन स्वच्छता करताना अशा प्रकारचा कचरा नियमितपणे उचलला जाणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नाही एव्हरशाईन येथील सेक्टर क्रमांक ६ मधील कचरा हा मागील पाच दिवसांपासून उचलला गेला नसल्याचे येथील रहिवासी संजय मिश्रा यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस आहेत अशा वेळी सुद्धा अनेक ठिकाणी दोन ते दिवस कचरा उचलण्यासाठी पालिकेचे कर्मचारी पोहचत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
शहराचे विद्रुपीकरण
वसई विरार महापालिका स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमाच्या माध्यमातून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे मात्र काही भागात कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले असून शहर बकाल दिसू लागले आहे. यासाठी जे अशा प्रकारचे शहराला विद्रूप करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा अशा पद्धतीने कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अतिकचऱ्याच्या ठिकाणांची पाहणी
वसई विरार शहरात अतिकचरा टाकण्याची ठिकाणे आहेत त्यांची पाहणी करण्यात येत आहे. तशा सूचनाही स्वच्छता निरीक्षकांना दिल्या असून नियमीत पणे कचरा उचलला जावा असेही सांगण्यात आले आहे.असे महापालिकेच्या उपायुक्त ( घनकचरा) अर्चना दिवे यांनी सांगितले आहे. याशिवाय शहरातील ज्या सोसायट्या आहेत त्याठिकाणी पाच हजार कचऱ्याचे डब्बे दिले असून त्यांनाही ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याच्या संदर्भात सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जनावरांचे आरोग्य धोक्यात
वसई विरार शहराचे झपाट्याने नागरिकरण होत असल्याने जनावरांसाठी उपलब्ध असलेले गवत ही कमी होऊ लागले आहे. त्यामुळे अनेक मोकाट जनावरे चाऱ्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतात. तर अनेकदा ही मोकाट जनावरे शहरात व गावातील उकिरड्यावर व कचऱ्याच्या ढिगाऱ्यजवळ टाकलेले अन्नपदार्थ, व पुठ्ठे , कागद नाईलाजाने खात असतात. काही वेळा हे अन्न हे प्लास्टिक पिशव्यामध्ये भरून टाकले जात आहे. त्यामुळे अन्नासोबतच प्लास्टिक ही गुरांच्या पोटात जाऊ लागले आहे. यामुळे याचा मोठा घातक परिणाम हा जनावरांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.