|| विकास महाडिक

मागणीपेक्षा आवक वाढल्याने शेकडो टन भाजी एपीएमसीत पडून; शेतकरी हवालदिल, व्यापारी चिंताग्रस्त

पहाटे तीन वाजता सुरू झाल्यापासून मध्यान्हपर्यंत सदैव गजबज असलेल्या तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक भाजीमंडईवर गुरुवारी अक्षरश: अवकळा पसरली होती. गेल्या दहा वर्षांत आली नाही तेवढी भाजी गुरुवारी बाजारात आली आणि भाज्यांचे दर गडगडले. पण दर निम्म्यावर येऊनही भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकाचा पत्ता नव्हता. मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने शेकडो टन भाजीपाला एपीएमसीत पडून होता. अशीच स्थिती शुक्रवारीही कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आणि दर घसरूनही मागणी नसल्याने व्यापारी चिंतेत पडले आहेत.

मुंबईला पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातून भाजीपुरवठा केला जातो. सर्वसाधारपणे मुंबई आणि आजूबाजूच्या एमएमआरडीए परिसरात लागणारी भाजी ही सहाशे ते साडेसहाशे ट्रक टेम्पो भरून येते आणि पहाटे तीन त दुपारी बारापर्यंत ती विकली जाते. गुरुवारी मात्र ह्य़ा भाज्यांची आवक चक्क १०० ट्रक-टेम्पोने वाढली आहे. आवक वाढली म्हणजे दर कमी होऊन खरेदीदार ही भाजी लागलीच खरेदी करतात, असा अनुभव आहे मात्र गुरुवारी हे चित्र वेगळे होते. भाज्यांचे दर ५० टक्क्यांनी घसरल्यानंतरही खरेदीदारांची गर्दी नसल्याने व्यापारी हैराण झाले. पुढय़ात पडलेल्या शेकडो किलो भाजीकडे हताशपणे पाहात व्यापारी दिसेल त्या खरेदीदाराला हाका मारत होते. काही व्यापारी ओळखीच्या खरेदीदाराला उधारीवरही माल नेण्याचे आर्जव करताना दिसून येत होते.

राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतमालाचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी भाज्या खुडून त्या लवकर बाजारात आणण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी लावला आहे. तुर्भे येथील घाऊक बाजारात गुरुवारी भाज्यांची आवक अचानक वाढण्याचे हे प्रमुख कारण असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

अवकाळी पावसाची भीती आणि परराज्यातून आलेला अतिरिक्त शेतमाल यामुळे गुरुवारी भाज्यांची आवक विक्रमी झाली आहे. त्यामुळे बाजारभाव ५० टक्क्याने कमी झाले असून ग्राहकांना त्यांचा फायदा मिळायला हवा मात्र घाऊक बाजारात खरेदीदारही कमी आले होते.     – कैलाश तांजणे, अध्यक्ष, नवी मुंबई घाऊक भाजीपाला महासंघ, नवी मुंबई. 

थेट पणन योजनेचा फटका?

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मुंबईत अथवा इतर शहरात थेट विक्री करण्याची मुभा दिली आहे. शेतकरी हा माल थेट नेऊन विकतो तोपर्यंत हे ठीक आहे पण या थेट पणन योजनेचा गैरफायदा स्थानिक व्यापारी घेऊ लागले असून तेच शेतकऱ्यांच्या नावाखाली हा शेतमाल थेट मुंबई अथवा इतर शहरात नेऊन विकत आहेत. तुर्भे येथील घाऊक बाजारात आवक वाढल्याने भाव तर कमी झाले आहेत पण याच वेळी थेट पणनद्वारे मुंबईत भाज्या उपलब्ध होत असल्याने घाऊक बाजारात खरेदीदार फिरकले नसल्याचे चित्र आहे.

किरकोळ बाजारात लूटच

घाऊक बाजारात कितीही भाव कमी झाले तरी त्याचे पडसाद किरकोळ बाजारत उमटत नाहीत असा असलेला पूर्वानुभव आजही खरा ठरला आहे. घाऊक बाजारात भाव कमी झाले असले तरी, किरकोळ बाजारात भाज्या चढय़ा दरानेच विकल्या जात आहेत. सकाळी लवकर येणारे खरेदीदार हे चांगल्या भागातील असल्याने ते खरेदी करणाऱ्या भाजीला चांगला दर देऊन जातात, मात्र सकाळी अकरानंतर येणारे ग्राहक हे शीव, मानखुर्दे, गोवंडी, यासारख्या झोपडपट्टी भागातील येत असल्याने ते दर कमी करून घेत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.