scorecardresearch

ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन, पाच दशकं नाट्य समीक्षा लिहिणारी लेखणी शांत

मागील पाच दशकं कमलाकर नाडकर्णी हे नाट्य समीक्षा लिहित होते, मुंबईत त्यांचं निधन झालं

vertan marathi theater critics kamlakar nadkarni passed away-mumbai
ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन


नाट्य समीक्षा लिहिण्यात ज्यांचा हात कुणीही धरू शकत नाही असे ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन झालं आहे. मागची ५० वर्षे ते नाट्य समीक्षा लिहित होते. नाट्य समीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द पाच दशकांची आहे. त्यांनी आत्तापर्यंत शेकडो नाटकांची समीक्षा केली आहे. उत्तम टीकाकार काय असतो याचं उदाहरण म्हणजे कमलाकार नाडकर्णी.

वयाच्या ८९ व्या वर्षी कमलाकार नाडकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. आज दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरातून त्यांची अंतयात्रा निघेल. त्यानंतर ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातून नाट्य समीक्षा लिहिण्यास त्यांनी सुरूवात केली. ‘महानगरी नाटक’, ‘राजा छत्रपती’ हे बालनाट्य, ‘नाटकी नाटक’ ही पुस्तके लिहिली आहे. कमलाकर नाडकर्णी हे सुरूवातीच्या काही वर्षांमध्ये सुधा करमकर यांच्या बालनाट्य संस्थेत लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून कार्यरत होते. त्यांची लेखनशैली खूप ओघवती आणि उत्तम होती. नाटक पाहिलं की त्यातले बारकावे टिपून दिग्दर्शक, कलाकरांच्या चुकांवर नेमकं बोट ठेवण्याचं काम ते आपल्या लेखनातून करत असत. एखादा प्रयोग रंगला तर तो का? किंवा का रंगला नाही याचं विश्लेषण करण्यात कमलाकर नाडकर्णी यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. नाटकांवर विलक्षण प्रेम करणारे आणि त्यासाठी योगदान देणारे असे लेखक, समीक्षक होणं हे दुरापस्तच. याच कमलाकर नाडकर्णी यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे.

कमलाकर नाडकर्णी यांनी ओळख नाट्य समीक्षक अशी असली तरी लेखक, नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सर्वच भूमिका ते जगले होते. अगदी बालरंगभूमी पासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. ‘संगत’, ‘अपत्य’, ‘पस्तीस तेरा नव्वद’, ‘क क काळोखातला’, ‘रात्र थोडी सोंगे फार’, ‘चंद्र नभीचा ढळला’ अशा कितीतरी नाटकांसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. कमलाकर नाडकर्णी यांच्या लेखन शैलीमुळे त्यांचा असा एक वाचक वर्ग निर्माण झाला होता. त्यांनी लिहिलेलं परीक्षण वाचून नाटक बघायचं की नाही हे हा वर्ग ठरवत असे.

नाट्य समीक्षक असलेल्या कमलाकर नाडकर्णी यांनी रंगभूमीवरदेखील काम केले आहे. नाडकर्णी यांनी सुधा करमरकर यांच्या ‘लिटल थिएटर’ या संस्थेच्या ‘बजरबट्टू’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘चिनी बदाम’ आदी बालनाट्यात काम केले आहे. ‘बहुरूपी’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या ‘जुलूस’ या नाटकातही त्यांनी काम केले होते. याच नाट्यसंस्थेसाठी राज्य नाट्यस्पर्धेसाठी त्यांनी काही इंग्रजी नाटकांचा मराठीत अनुवाद केला होता. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये त्यांनी शिबिरांमध्ये नाट्य प्रशिक्षणार्थींनी मार्गदर्शन केले होते. ‘नांदी’ नावाच्या देविदास तेलंग यांच्या पाक्षिकात त्यांनी नाट्यपरीक्षणे लिहायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात नाट्यसमीक्षणास सुरुवात केली होती. पुढे त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये नाट्य समीक्षण करण्यास सुरुवात केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 07:30 IST