मुंबई : मूर्तीमंत सोज्वळता, लोभस चेहरा, बोलके डोळे आणि वागण्या-बोलण्यातील शालीनता या जोरावर एक सर्वागसुंदर व्यक्तिमत्व म्हणून सुलोचना पडद्यावर लोकप्रिय ठरल्याच, पण त्याही पलिकडे त्यांनी अनेकांशी स्नेहबंध निर्माण केले होते. सुलोचना यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे.
त्यांचे मूळ नाव सुलोचना लाटकर. बेळगावात चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांचे आकर्षण होते, मात्र त्यांचा या क्षेत्रात झालेला प्रवेश हा त्या काळात तसा नवलाचाच. त्यांच्या वडिलांच्या मित्राने केलेल्या शिफारशीवरून मा. विनायक यांच्या प्रफुल्ल चित्र येथे त्यांना प्रवेश मिळाला. चित्रपट कंपन्यांचा तो काळ होता. सुरूवातीला ३० रुपये मासिक पगारावर काम करणाऱ्या दीदींनी १९४३ साली ‘चिमुकला संसार’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. मा. विनायक यांची प्रफुल्ल चित्र ही संस्था कोल्हापूरमध्ये होती. ती मुंबईत हलवल्यानंतर सुलोचना चित्रपट क्षेत्रापासून काही काळापुरत्या दूर गेल्या. याच दरम्यान त्यांचा विवाह आबासाहेब चव्हाण यांच्याशी झाला आणि पतीच्या इच्छेमुळे त्या पुन्हा चित्रपटांशी जोडल्या गेल्या.
इथेच त्यांना या क्षेत्रातील त्यांचे गुरू भालजी पेंढारकर भेटले. भालजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांची चित्रपट कारकिर्द बहरत गेली. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांना पुन्हा एकदा दासीची छोटेखानी भूमिका मिळाली. त्यानंतर १९४४ मध्ये जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘करीन ती पूर्व’ या नाटकात त्यांनी काम केले.
पुढे ‘सासुरवास’, ‘जीवाचा सखा’, दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’, ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.
भालजी पेंढारकरांनी स्टुडिओची पुन्हा उभारणी केल्यानंतर ‘शिवा रामोशी’, ‘मीठ भाकर’, ‘साधी माणसं’, ‘राजा शिवाजी’ अशा एकाचवेळी कौटुंबिक, सामाजिक, ऐतिहासिक चित्रपटांतून सुलोचनादीदीनी विविधांगी भूमिका केल्या.
एकीकडे मराठी शालीन, घरंदाज नायिका तर कधी शेतकरी – गोरगरीब समाजातील नायिका दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी प्रभावीपणे रंगवल्या. ‘संत गोरा कुंभार’, ‘मोलकरीण’, ‘प्रपंच’, ‘अन्नपूर्णा’, ‘वहिनीच्या बांगडय़ा’ अशा कितीतरी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
आदरांजली (१९२८-२०२३)
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. सुलोचनादीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सुलोचनादीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
*****
तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
*****
रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयाने सिनेरसिकांना आई, बहीण, वहिनीच्या नात्याचे ममत्व देणाऱ्या सुलोचनादीदींच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे. सुलोचनादीदींनी मराठी, हिंदी चित्रपटांत साकारलेल्या भूमिका चरित्र अभिनयाच्या आदर्श आहेत.
– अजित पवार, विरोधी पक्षनेते
*****
सुलोचनादीदींच्या जाण्याने सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पोरकी झाली. सुमारे सहा दशके सुलोचनादीदींनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
*****
पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि मृदू स्वभावी नामवंत अभिनेत्री गमावल्याचे दुख: आहे. प्रेक्षकांना अभिनयाची भुरळ घालणाऱ्या सुलोचना लाटकर यांनी या क्षेत्रात स्वत:च्या मृदू स्वभावातून आदर्श निर्माण केला.
– सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
*****
हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘आई’ हे सिनेमातले महत्त्वाचे पात्र असायचे. पण ‘आई’पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केले ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचनादीदींनी. एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो, जो सुलोचनादीदींच्या वाटय़ाला आला होता. अशी ‘आई’ होणे नाही, अशी ‘दीदी’ होणे नाही.
– राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
*****
एक स्पॉटबॉय ते स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून उभे राहण्याचा माझा संघर्षांचा सहा-सात वर्षांचा काळ सुलोचनादीदींच्या घरी आणि त्यांच्या प्रेमळ सहवासात घालवण्याचे भाग्य मला मिळाले. या काळात मी काय वाचतो, काय पाहतो या सगळय़ावर त्या देखरेख करत, माझ्या जडणघडणीवर त्यांचे पूर्ण लक्ष होते.
– राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक
*****
चित्रपटसृष्टीत मी सुलोचनादीदींचा हात पकडून आलो आणि आज त्यांच्याच निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले आहे. माझ्या हातून गेल्या वर्षी एका पुरस्कार सोहळय़ात सुलोचनादीदींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती.
– महेश कोठारे, अभिनेते-दिग्दर्शक
*****
मराठीत सुवर्णकाळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या, मात्र नवोदित कलाकारांना कायम प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्या मागे कायम उभ्या राहणाऱ्या अशा सुलोचनादीदी होत्या. आमचे काम चांगले झाले, वाईट झाले तर त्या स्वत:हून आमच्याशी संपर्क साधून त्याविषयी सांगत असत.
अलका कुबल, ज्येष्ठ अभिनेत्री
*****
‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात सुलोचनादीदींची भूमिका मी साकारावी ही त्यांचीच इच्छा होती. अनेक दशके चित्रपटसृष्टीवर लक्ष ठेवून असणाऱ्या आणि मायेची पाखर कलाकारांवर पांघरणाऱ्या सुलोचनादीदींच्या जाण्याने सिनेसृष्टीत न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.
– सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
*****
‘सांगत्ये ऐका’ चित्रपटाच्या वेळी माझी आणि त्यांची पहिली भेट झाली होती. त्यांनी हाक मारून बोलावून घेतले आणि जवळ बस असे म्हणाल्या. हा प्रसंग अजून माझ्या मनात घर करून आहे.
– लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्री
*****
संस्कार या शब्दाचा अर्थ जन्मदात्री माऊलीनंतर सुलोचना दीदी यांनी वर्तनातून शिकविला. चंद्रकांत, निळू फुले अशा कलाकारांनाही दीदींबरोबर काम करताना आनंद होत असे.
– आशा काळे, ज्येष्ठ अभिनेत्री