बीफ पार्टी आणि किस (चुंबन) इव्हेंट आयोजित करणाऱ्यांवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी निशाणा साधला. त्याचबरोबर संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला फाशी देण्याच्या विरोधात कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवरही टीका केली. तुम्हाला बीफ खायचं आहे, तर तुम्ही ते खा. पण त्याच्या फेस्टिवलचे आयोजन का करताय? असेच चुंबनाचे आहे. जर तुम्हाला एखाद्याचे चुंबन घ्यायचे आहे तर घ्या, त्यासाठी तुम्हाला फेस्टिवलची काय गरज, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यादरम्यान नायडू यांनी अफजल गुरूचाही उल्लेख केला. आत तुम्ही अफजल गुरूचं घ्या. काही लोक त्याच्या नावाचा जप करत असतात. हे काय होत आहे. त्याने आपल्या संसदेला उडवून देण्याचा प्रयत्न केला होता, असे ते म्हणाले.

मुंबईतील आर ए पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित पालक, शिक्षक आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना घर आणि महाविद्यालयातील वातावरण तणावरहित ठेवण्याचा सल्ला दिला. अनेक पालक आपल्या मुलांची क्षमता समजून घेत नाहीत, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रात मंत्री असतानाही बीफ वादावर नायडू यांनी वक्तव्य केले होते. मी स्वत: मांसाहारी आहे. सर्वांना त्यांच्या पंसतीचे भोजन करण्याचा हक्क आहे. मला मांसाहार करण्यापासून कोणी रोखलेले नाही. जेवण हे व्यक्तिगत आवडीनिवडीचा प्रकार असल्याचे ते म्हणाले होते.