राज्यात एखाद्या गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या व्यक्तीस किंवा त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन’ योजना लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात एखाद्या गुन्ह्यांमध्ये जीवितहानी झाल्यास या योजनेंतर्गत जिल्हा किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्या व्यक्तीच्या वारसांना कमाल दोन लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीस कमाल ५० हजार रुपये आणि ऍसिड हल्ला झाल्यास त्या व्यक्तीस तीन लाख रुपये एवढी नुकसान भरपाई देण्यात येईल. याशिवाय बळी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी दोन हजार रुपये आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी झालेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी १५ हजार रुपयांपर्यत मदत देण्यात येणार आहे. या योजनेचे नियंत्रण गृह विभाग करणार आहे.