मुंबईतील लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्यानंतर अर्ध्यातासानंतरही या ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्या नव्हत्या. दरम्यान या दुर्घटेनेमध्ये येथील एका सुरक्षारक्षकाचा अंत झाला आहे. आगीपासून वाचण्यासाठी बाल्कनीला लटकलेल्या सुरक्षारक्षकाचा खाली पडून मृत्यू झाला. हा सर्व थरार कॅमेरात कैद झाला आहे.

या उंच इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल चारची असल्याचं सांगण्यात येत आहे. वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता थिएटर समोर आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. अनेकजण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही दिसून आलं आहे. पडलेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. मरण पावलेल्या सुरक्षारक्षकाचं नाव राम तिवारी असं असून इमारतीमध्ये आणखी दोन जण अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवाजा उघडल्यानंतर आग अंगावर आल्याने सुरक्षारक्षकाने पळण्याचा प्रयत्न केला आणि तो बाल्कनीमध्ये गेला. तिथे तो लटकत होता तिथून खाली पडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. केईएम रुग्णालयामध्ये या ३० वर्षीय सुरक्षारक्षकाला दाखल करण्यात आलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

स्थानिक आमदार अजय चौधरींनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. आग लागल्यानंतर तासाभरानंतर अग्निशामन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. १९ व्या माळ्यावर फर्निचरचे काम सुरु असताना शॉकसर्किट झाले आणि आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भागामधील गल्ल्या आणि रस्ते अरुंद असून अग्निशामन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचायला वेळ लागू शकतो. तसेच आग १९ व्या मजल्यावर असल्याने तिथपर्यंत पोहचण्यास आखणीन वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.