|| रेश्मा शिवडेकर
पारंपरिक मतदारसंघ की विद्यमान आमदार; जागावाटपादरम्यान वाद उद्भवण्याची शक्यता:- विधानसभा निवडणुकीत महायुती करून पुन्हा सत्तेत येणार, असे शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी, युतीचे सूत्र ठरल्यानंतर जागावाटपावरून दोन्ही पक्षांत नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. विशेषत: मुंबईतील सात मतदारसंघांबाबत हा पेच निर्माण होऊ शकतो. युतीतील पूर्वीच्या जागावाटपानुसार मतदारसंघांचे वाटप करायचे की विद्यमान आमदार कुणाचा, यानुसार निर्णय घ्यायचा या मुद्दय़ावरून हे मतदारसंघ वादाचे कारण ठरू शकतात.
२०१४ साली दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवून पहिल्यांदाच आपली ताकद अजमावली. त्यात २००९पर्यंत सेनेच्या वाटय़ाला येणाऱ्या अनेक जागा मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपने आपल्या खिशात टाकल्या. यातील काही तर जागा सेनेचे सुभाष देसाई, विनोद घोसाळकर आदी बडय़ा नेत्यांचा पराभव करून भाजपने जिंकल्या. त्यात मधल्या काळात भाजपवासी झालेले प्रवीण दरेकर (मनसे), कालिदास कोळंबकर (काँग्रेस) आणि अजूनही भाजपच्या वाटेवर असलेले काही नेते यांमुळे युती झाली तरी मुंबईत जागावाटपाची गणिते कधी नव्हे ती कठीण होणार आहेत.
मुंबईत २००९ला एक-दोन अपवाद वगळता दोन्ही पक्षांनी फारशा कुरबुरी न करता आपापल्या वाटय़ाला आलेल्या जागा लढवल्या. मात्र, २०१४मध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर आणि त्यानंतर आलेल्या पालिका निवडणुकीनंतर मात्र मुंबईतील युतीची घडी विस्कटली. २०१४मध्ये मुंबईत भाजपची नव्याने प्रभावक्षेत्रे उदयाला आल्याने या जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ दहिसरची जागा. या २००९साली मनसे फॅक्टर असतानाही सेनेने ही जागा आपल्याकडे खेचून आणली. २०१४मध्ये मात्र मोदी लाटेत ही जागा भाजपच्या हाताला लागली आणि येथून भाजपच्या मनीषा चौधरी निवडून आल्या. आता ही जागा कुणाच्या वाटय़ाला जाणार असा प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची जागा गोरेगावची. सेनेकडे असलेली ही जागा २०१४मध्ये भाजपच्या विद्या ठाकूर यांनी सुभाष देसाई यांचा पराभव करून जिंकली. त्यामुळे या जागेवर या वेळेस साहजिकच भाजपकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. तशीच वर्सोवाची जागाही २००९ साली सेनेने लढवली असली तरी २०१४ला भारती लव्हेकर यांनी ती भाजपकडे खेचून आणली. हाच तिढा अंधेरी (पश्चिम), विलेपार्ले याही जागांबाबत आहे. अंधेरी (पश्चिम) २००९ साली सेनेने लढवली असली तरी ती आता भाजपच्या अमित साटम यांच्याकडे आहे. तर सेनेकडची विलेपार्लेची जागा पराग अळवणी यांनी भाजपकडे खेचून आणली.
त्यात इतर पक्षांमधील आयारामांना दोन्ही पक्षांनी मुक्तपणे प्रवेश दिल्याने या तिढय़ात भर पडली आहे. दहिसरला लागूनच असलेल्या मागाठाणेत राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या प्रकाश सुर्वे यांनी २०१४ला विजय मिळवला. आता या जागेवर सध्या भाजपमध्ये असलेल्या परंतु २००९ साली मनसेतून आमदारकी मिळवणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्याकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. हाच तिढा वडाळ्याच्या कालिदास कोळंबकर यांच्याबाबत निर्माण होणार आहे.