राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रतिनिधीत्व करीत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यात पवार यांना यश आले असून, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव शनिवारी निश्चित करण्यात आले.
माढा मतदारसंघातील नेत्यांना पाचारण करून पवार यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी द्यायची, असा स्पष्ट संदेश दिला. परिणामी विजयदादांच्या नावाला विरोध करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील आमदारांना तलवारी म्यान कराव्या लागल्या. मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीला सोलापूर जिल्ह्यातीलच आमदारांनी विरोध केला होता. स्वत: पवार मात्र मोहिते-पाटील यांच्यासाठी आग्रही होते. शेवटी पवार यांनी व्हेटो वापरून मोहिते-पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यास भाग पाडले. बुलढाणा मतदारसंघात भाजपच्या माजी आमदार रेखा खेडेकर यांना उमेदवारी देण्याची योजना असली तरी आमदार राजेंद्र शिंगणे यांनी त्याला विरोध दर्शविला आहे. बुलढाणा बँकेला राज्य सरकारने आर्थिक मदत केल्यास पक्षासाठी ते फायद्याचे ठरेल, असा युक्तिवाद शिंगणे यांनी केला.
नाशिकमध्ये छगन भुजबळ की समीर भुजबळ या काका-पुतण्यावरून तिढा निर्माण झाला आहे. छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची पवार यांची योजना आहे. मात्र भुजबळ यांना दिल्लीत जायचे नाही तर समीर यांना दिल्लीत जाण्यात जास्त रस आहे. उद्याच्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सातारा मतदारसंघात विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्यास पक्षातील नेत्यांचा विरोध आहे. रामराजे नाईक-निंबाळर यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. उद्या साताऱ्याचा निर्णय पवार घेणार आहेत.