‘बेदिलीचे बादल’ अग्रलेखावरील लेखन स्पध्रेचे मानकरी
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न जुमानता, अस्मितेच्या नावाने राजकारण करण्याची पंजाब सरकारने केलेली कृती ही गंभीर होती. कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पंजाबच्या प्रकाशसिंग बादल सरकारनेच अधिकृतपणे कायदेभंगाचा पण केल्याने ही परिस्थिती अराजकाकडे सुरू असलेला प्रवास अधोरेखित करते. या अग्रलेखावर भाष्य करणाऱ्या ‘बेदिलीचे बादल’ या अग्रलेखावरील लेखन स्पर्धेचा प्रथम मानकरी ठरला आहे, कोल्हापुरातील महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विक्रम सावंत. तर, हिंगोलीतील आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रणव खाडे याने या स्पर्धेचे दुसऱ्या स्थानाचे पारितोषिक पटकावले आहे.
विक्रमला सात हजार आणि प्रमाणपत्र तर प्रणवला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. बक्षिसाच्या रकमेबरोबरच या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
पंजाब व हरयाणा यांच्यातील पाणीवाटप करार न्यायप्रविष्ट असून सध्या जैसे थे परिस्थिती ठेवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही पंजाब सरकार तो मानण्यास तयार नाही यावर या अग्रलेखात प्रकाश टाकण्यात आला होता. त्यावर विक्रम आणि प्रणव यांनी ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त होताना आपल्या विचार व लेखनशैलीची चुणूक दाखविली होती.
महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते.
हे लक्षात ठेवा
’ प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्तव्हायचे असते.
’ त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते.
’ या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.