मुंबईत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रपट व दूरचित्रवाणी विद्यापीठ स्थापन केले जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. त्याचबरोबर दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर नाशिक येथे महाराष्ट्र नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
विधान परिषदेत एका प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना तावडे यांनी राज्यातील गडकिल्ल्यांची दूरवस्था असल्याचे मान्य केले. त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना करीत आहे, असे त्यांनी सांगितले. रायगड महोत्सवाप्रमाणेच या महिन्याच्या अखेरीस सिंधुदुर्ग महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मराठी नाटकांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक जिल्’ाात एक नाटय़गृह बांधण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. दर वर्षी कुसुमाग्रज किंवा ज्ञानपीठकार या नावाने महोत्सव साजरा करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. नाशिक येथे चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाच्या जागेत महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा अशी स्वंतत्र संस्था सुरू करण्यात येणार आहे, असे तावडे यांनी सांगितले.