मुंबई : मानखुर्द येथे रविवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली, तर काही अनोळखी तरुणांनी वाहनांची तोडफोड केली. दुसऱ्या घटनेत मालवणी येथे पोलिसांची परवानगी न घेता मिरवणूक काढण्यावरून वाद उद्भवला.  

मानखुर्द येथील म्हाडा कॉलनी परिसरात रविवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. तसेच काही अनोळखी तरुणांनी रस्त्यालगतच्या सुमारे ३० वाहनांची तोडफोड केली. तसेच मालवणी येथे पोलिसांची परवानगी न घेता मिरवणूक काढल्याप्रकरणी सुमारे ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानखुर्द आणि मालवणी येथे

संघर्षांची परिस्थिती उद्भवली होती, मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणाखाली आणल्याने अनर्थ टळला.

रामनवमीनिमित्त रविवारी मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीत मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र रात्री ११च्या सुमारास तेथे दोन गटांत हाणामारी झाली. काही वेळाने या ठिकाणी ३० ते ४० जण काठय़ा घेऊन आले आणि त्यांनी रस्त्यालगतच्या ३० वाहनांची मोडतोड केली. त्यांत रिक्षा, टॅक्सी, दुचाकी आणि काही खासगी चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. मानखुर्द पोलिसांनी तत्काळ परिसरातील बंदोबस्त वाढवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत बेकायदा मिरवणूक काढण्याचा प्रयत्न एका गटाने केला. तेथून वादास तोंड फुटले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. राजकीय पक्ष आणि एका संघटनेशी संबंधित ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त घटनास्थळी

मानखुर्द येथील घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी सकाळी मानखुर्द पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मालवणी येथेही अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दोन्ही घटनांच्या चौकशीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.