विश्व मराठी साहित्य संमेलन कायमचे बारगळण्याची चिन्हे असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज २ जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा व निर्णय होणे अपेक्षित आहे. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमान येथे होणार असल्याची चर्चा असून या बैठकीत त्यावरही अधिकृतशिक्कामोर्तब केले जाणार आहे.
विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी यापुढे अनुदान दिले जाणार नसल्याने तसेच परदेशातील काही आयोजक संस्थांनी महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तिकिटे काढण्याबाबत दाखविलेली असमर्थता यामुळे महामंडळाची पंचाईत झाली असल्याने महामंडळ या निर्णयाप्रत आले आहे. अंदमानचे संमेलन पार पडल्यानंतर ‘विश्व मराठी’ कायमचे बंद केले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विश्व मराठी साहित्य संमेलनालाही राज्य शासनाकडून २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते; पण या निधीतून महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या परदेशवारीचीच तिकिटे काढली जातात, हे माहितीच्या अधिकाराअंतर्गत स्पष्ट झाले होते. टोरांटो संमेलन रद्द झाल्याने राज्य शासनाकडून मिळालेले २५ लाख रुपये परत करण्याची नामुष्कीही महामंडळावर ओढविली होती. अगोदर झालेल्या तीन विश्व मराठी साहित्य संमेलनांचा हिशोब द्यावा आणि शासनाकडून देण्यात आलेली मदत महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासाची तिकिटे काढण्यासाठी खर्च केली जाऊ नये, अशी दिलेली तंबी आणि विश्व मराठी साहित्य संमेलनाला यापुढे अनुदान दिले जाणार नाही, असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महामंडळापुढे पेच निर्माण झाला आहे.
‘विश्व मराठी’बाबत बैठकीतील चर्चेत काय निर्णय होईल तो आत्ताच कसा सांगता येईल? सर्वतोपरी अनुकूल परिस्थिती असेल तरच महामंडळ हे संमेलन घेते. संमेलन दर वर्षी घेतलेच पाहिजे असेही बंधन नाही. संमेलनासाठीचे अनुदान मुख्यमंत्री निधीतून मिळते. हे अनुदान बंद करण्याबाबतचे कोणतेही लेखी पत्र शासनाकडून महामंडळाला प्राप्त झालेले नाही.
– डॉ. माधवी वैद्य, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwa marathi sahitya sammelan 2 july
First published on: 02-07-2015 at 03:42 IST