वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन तसेच वाचिक अभिनयाची जोपासना करण्याच्या उद्देशाने ‘व्हिजन’ आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘चला वाचू या’ हा उपक्रम राबविण्यात येतो. येत्या १९ जून रोजी उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने ‘व्हिजन’चे श्रीनिवास नार्वेकर यांच्याशी केलेली बातचीत..
श्रीनिवास नार्वेकर, संचालक, व्हिजन
* ‘चला वाचू या’ हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश काय?
दूरचित्रवाहिन्या, स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक यांच्या आक्रमणात मराठी वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याचे बोलले जाते. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एकूण आजची तरुण पिढी मराठी वाचत नाही, अशी ओरड ऐकू येते. त्या पाश्र्वभूमीवर केवळ चर्चा करीत न बसता किंवा कोणाला नावे न ठेवता आपल्याला काय ठोस कृती करता येईल, असा विचार मनात आला. त्या दृष्टीने प्रत्यक्ष काही तरी केले पाहिजे असे वाटले. यातून ‘चला वाचू या’ या अभिनव उपक्रम आकारास आला. वाचन संस्कृती वाढविणे, नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व वाचिक अभिनयाची जोपासना व ओळख निर्माण करून देणे हा उद्देश या मागे आहे.
* प्रत्यक्षात हा उपक्रम कधी सुरू झाला?
पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे यांच्याकडे आम्ही याबाबतचा प्रस्ताव घेऊन गेलो. त्यांना उपक्रम खूप आवडला आणि अकादमीच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यास सहमती दर्शविली. आमचा पहिला कार्यक्रम २१ जून २०१५ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी झाला. अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र हे आमच्या पहिल्या कार्यक्रमाचे अतिथी अभिवाचक होते. आमच्या पहिल्याच कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
‘चला वाचू या’ हा उपक्रम दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सायंकाळी पाच वाजता पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित केला जातो. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अतिथी अभिवाचकांना आम्ही कोणतेही मानधन देत नाही. अतिथी अभिवाचकांबरोबरच काही कार्यक्रमातून सर्वसामान्य वाचकांनाही कार्यक्रमात अभिवाचन करण्याची संधी दिली जाते. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असतो.
आतापर्यंत अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांच्यापासून झाली. आत्तार्प्यत अभिनेते विजय कदम, संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री शर्वाणी पिल्ले, नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक अभिराम भडकमकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर, अभिनेते शैलेश दातार, बालसाहित्यकार अनंत भावे, अभिनेते व दिग्दर्शक राजन ताम्हाणे, दिग्दर्शक सुशील इनामदार, रंगकर्मी रवींद्र लाखे तसेच अन्य मान्यवर सहभागी झाले होते.
सर्वसामान्यांना या कार्यक्रमात कशा प्रकारे सहभागी करून घेतले जाते?
या कार्यक्रमाची आखणी आम्ही केली तेव्हा वृत्तपत्र आणि अन्य प्रसार माध्यमांतून आम्ही वाचकांना त्यांनी त्यांच्या आवाजातील अभिवाचनाची ध्वनिफीत पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्याकडे अशा ९५ ध्वनिफीत विविध लोकांकडून आल्या. त्यातील काही निवडक लोकांना आम्ही आमच्या ‘चला वाचू या’ उपक्रमात अभिवाचक म्हणून संधी देतो.
* कार्यक्रमाचे स्वरूप कसे असते?
कार्यक्रमात अतिथी वाचक आणि सर्वसामान्य वाचक असे तीन ते चार जण असतात. केवळ एकाच साहित्य प्रकाराचे वाचन होऊ नय,े असा आमचा कटाक्ष असतो. अभिवाचक म्हणून जे सहभागी होतात, त्यांनी त्यांच्या आवडीचे अभिवाचन करावे, असे आम्ही त्यांना सांगतो. कथा, कादंबरी, वृत्तपत्रातील वैचारिक लेख, वृत्तपत्रातील स्तंभलेखन याचा यात समावेश असतो. एखादा लेखक सहभागी होणार असेल तर त्याने त्याची स्वत:ची कथा, त्याला आवडणाऱ्या अन्य लेखकाची कथा आणि अन्य दोन कथा वाचाव्यात, असे आम्ही त्याला सुचवितो. सुमारे अडीच ते तीन तासांच्या या कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आणि लेखकांचे साहित्य पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.
* आत्तापर्यंत झालेल्या उपक्रमातील काही वेगळेपण?
ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका वंदना मिश्र यांच्या ‘मी मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राच्या अभिवाचनाचा पहिला प्रयोग या उपक्रमात झाला. मानसी कुलकर्णी व उदय नेने यांनी अभिवाचन केले तर दिग्दर्शन विश्वास सोहनी यांचे होते. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने उपक्रमाचा कार्यक्रम आम्ही पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात आयोजित केला. कोजागरीच्या चांदण्यात रात्री सुरू झालेला हा कार्यक्रम पाच तास रंगला.
उपक्रमाच्या एक वर्षांच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता तांबे, ज्योती अंबेकर, राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे (एनएएसडी)चे माजी संचालक व अभिनेते रामगोपाल बजाज हे मान्यवर सहभागी होणार आहेत. ते अभिवाचन करतील. सकाळी दहा ते दुपारी दीड या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या पूर्वीच्या उपक्रमात जे अभिवाचक सहभागी झाले होते, त्यापैकी काही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
* या उपक्रमाला यश किती मिळाले?
अभिवाचनाचे कार्यक्रम होत असतातच. पण दर महिन्याला एक असा अभिवाचनचा उपक्रम आम्ही सुरू केला. अन्य काही ठिकाणी ‘चला वाचू या’चा उपक्रम सुरू करता येईल का, अशी विचारणा आमच्याकडे करण्यात येत आहे. अन्य काही संस्थांनी अभिवाचनाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद व सर्वसामान्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यात ‘चला वाचू या’ चा खारीचा का होईना वाटा आहे आणि तेच आमच्या कार्यक्रमाचे मोठे यश आहे, असे वाटते.
शेखर जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vision director shrinivas narvekar interview for loksatta
First published on: 31-05-2016 at 02:59 IST